उस्मानाबाद : ब्रेक दि चेन अभियान सुरु असताना घालून दिलेल्या निर्बंधांचे पालन न करणा-या नागरिकांवर रविवारी दिवसभर पोलिसांनी जोरदार कारवाई केली. दिवसअखेर सुमारे ८६८ कारवाया होऊन त्यातून पोलिसांनी जवळपास २ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.
ब्रेक दि चेन अभियानांतर्गत प्रशासनाने नागरिकांच्या स्वैर वर्तनावर निर्बंध आणण्यासाठी आरोग्यविषयक काही नियमावली आखून दिली आहे. तरीही काही नागरिक कोणतेही बनेल कारण देऊन मोकाट फिरताना आढळून येत आहेत. शिवाय, मास्क, सुरक्षित अंतर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे याबाबतही असलेले नियम टाळून गैरवर्तन करताना आढळून येत आहेत. यावर आळा बसावा यासाठी रविवारी दिवसभर पोलिसांनी जिल्ह्यातील बहुतांश भागात कारवाया केल्या. यातून १ लाख ९७ हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोणत्या, किती झाल्या कारवाया...
१. दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर न राखणे या नियमांचा सर्वाधिक भंग झाल्याचे दिसते. रविवारच्या कारवाईत सर्वाधिक दंड या नियमाखाली वसूल झाला. एकूण ८०१ कारवाया दुकानचालक व ग्राहकांवर करण्यात आल्या आहेत. त्यातून १ लाख ६३ हजार ७०० रुपये दंड वसूल झाला.
२. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणा-या ४१ जणांना दंडाची झळ बसली. त्यांच्याकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण २० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
३. वाहनांनाही प्रवासी मर्यादा घालून देण्यात आली आहे. तरीही ही मर्यादा ओलांडून जादा प्रवासी घेऊन जाणार्या १६ वाहनांवर कारवाई झाली. त्यांना ८ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.
४. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास बंधन असतानाही ८ जणांनी या नियमाचे उल्लंघन केल्याचे आढळताच त्यांना प्रत्येकी ४०० रुपयांप्रमाणे ३ हजार २०० रुपये दंड करण्यात आला.
५. जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या २ कारवाया जिल्ह्यात झाल्या असून, २ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.