तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील गंजेवाडी, पिंपळा (बु) व माळुंब्रा या गावातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे प्रशासनाने ही गावे रेड झोन म्हणून घोषित करून गावच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत, परंतु स्थानिक प्रशासनाने मात्र अद्यापही याबाबत कार्यवाही केली नसल्याचे चित्र आहे.
उपविभागीय आधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी गंजेवाडी, पिंपळा (बु) आणि माळुंब्रा ही तीन गावे रेड झोन म्हणून घोषित केली आहेत. या संदर्भात काढलेल्या आदेशामध्ये गावापासून ३ किमी अंतरावरील सीमा बंद करण्याबाबत स्पष्ट केले आहे, परंतु आदेश काढून दोन दिवस उलटले, तरी गावच्या सीमा अद्यापही बंद करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे स्थानिक प्रशासनाकडून उपाययोजना करण्याबाबत उदासीनता असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, सोलापूर येथे उपचार घेणाऱ्या गंजेवाडी येथील एका बाधित रुग्णाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे १५ दिवसांतील हा कोरोनाचा चौथा बळी आहे. काटी गावातही कोरोनाचा कहर सुरूच असून, येथेही तीन दिवसांत चौघांचा मृत्यू झाला आहे. यावरून ग्रामीण भागातही कोरोनाचा उद्रेक वाढत चालल्याचे दिसत असताना उपाययोजना राबविण्याबाबत मात्र प्रशासनाकडून हयगय होत असल्याने ग्रामस्थांत संताप व्यक्त होत आहे.
चौकट
दीड तासांत लस संपली
सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी लस टोचून घेण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून सुरतगाव, सांगवी, सावरगाव आदी गावांतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती, परंतु दवाखान्यात केवळ १४० डोसच प्राप्त झाल्याने दीड तासांत उपलब्ध लसीचा साठा संपला. त्यामुळे जवळपास तीनशे नागरिकांना रिकाम्या दंडाने परतावे लागले. दरम्यान, डॉ.स्नेहा मोटे यानी लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना दवाखान्यासमोर उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी सावलीची सोय केली होती.
चौकट
सरहद्दीवर तपासणी नाका
कोरोनाचा संसर्ग वाढू नये, लॉकडाऊन काळात मोकाट फिरणाऱ्यांना चाप बसावा, यासाठी तामलवाडी पोलिसांच्या वतीने सपोनि सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी सरहद्दीवर २४ तास तपासणी नाका कार्यरत ठेवण्यात आला आहे. ई-पासशिवाय पर जिल्ह्यातील वाहनांना प्रवेश दिला जात नाही. या नाक्यावर ४ पोलीस कर्मचारी, ८ होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे.
चौकट
काटीत आठ दिवस कडक लॅाकडाऊन
काटी गावात कोरोनाने चौघांचा बळी घेतल्यानंतर प्रशासनाकडून कडक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. सरपंच आदेश कोळी यांनी मंगळवारपासून काटी गावात आठ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर आहे. यासाठी गावकऱ्यानी सहकार्य करावे, असे आवाहनही कोळी यांनी केले आहे.