परंडा शहरात धाडशी चाेरी; लाखाेंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:31+5:302021-06-20T04:22:31+5:30

परंडा : भरदुपारी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञातांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी दुपारी शहरातील ...

Bold chari in the city of Paranda; Lampas worth lakhs | परंडा शहरात धाडशी चाेरी; लाखाेंचा ऐवज लंपास

परंडा शहरात धाडशी चाेरी; लाखाेंचा ऐवज लंपास

परंडा : भरदुपारी बंद घराचे कुलूप तोडून अज्ञातांनी रोख रकमेसह लाखोंचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी दुपारी शहरातील समर्थ नगर भागात घडली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध परंडा ठाण्यात गुन्हा नाेंद करण्यात आला आहे. याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, परंडा तालुक्यातील रुई येथील इंद्रजित मुळीक हे शिक्षक गाैंडरे (ता. करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात नाेकरीस आहेत. शहरातील रुई रस्त्यावरील समर्थ नगरात त्यांचे घर आहे. शुक्रवारी ते सपत्निक परगावी गेले होते, तर त्यांचा मुलगा धीरज हा घरीच होता. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून तो जेवणासाठी चुलते लहु मुळीक यांच्याकडे गेला होता. हीच संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम दीड लाख रुपये, सोन्याच्या तीन अंगठ्या, दोन लहान अंगठ्या, चांदीचे पंचपाळे, चांदीची चैन असा सुमारे दोन लाख २६ हजार १०० रुपयांचा ऐवज चाेरून पाेबारा केला. दरम्यान, जेवण करून धीरज घरी परत आल्यानंतर घरफाेडी झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. समर्थ नगरात उचभ्रू, नाेकरदार, अधिकारी व कर्मचाऱ्यांची घरे आहेत. भरदिवसा चोरीची घटना घडल्याने नागरिकांत घबराट पसरली आहे. याप्रकरणी धीरज इंद्रजित मुळीक यांच्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांत चोरीच्या घटनेची नोंद शुक्रवारी रात्री उशिरा झाली आहे. पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दादासाहेब बनसोडे पुढील तपास करीत आहेत.

चाैकट...

‘प्लुटाे’ला गवसला नाही माग...

चोरट्यांचा माग काढण्यासाठी शनिवारी उस्मानाबाद येथील श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. ‘प्लुटो’ नावाचे पोलीस श्वान घटनास्थळीच घुटमळले, तर पोनि गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि ससाने, बनसोडे, हवालदार शेख, शेंदारकर, गायकवाड, भोसले यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

Web Title: Bold chari in the city of Paranda; Lampas worth lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.