पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा सहाव्या दिवशी सापडला मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST2021-07-15T04:22:55+5:302021-07-15T04:22:55+5:30
बबन भगवान रसाळ (रा. लासोना) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते ९ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या ...

पुरात वाहून गेलेल्या व्यक्तीचा सहाव्या दिवशी सापडला मृतदेह
बबन भगवान रसाळ (रा. लासोना) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते ९ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले होते. यानंतर लागलीच आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक दल, महसूल, पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी ओढ्यात व तेरणा नदीपात्रात शोधकार्य सुरु केले होते. ड्रोन कॅमेरा, बोट व गळ टाकून ५ दिवस सलगपणे शोध घेतला. परंतु, पथकाच्या हाती काहीच लागले नव्हते. दरम्यान, बुधवारी समुद्रवाणी येथील शेतकरी युवराज ढोबळे यांनी नदीकाठी असलेल्या शेतातील पाणी काढून देण्यासाठी सालगड्याला सांगितले. त्यानुसार समाधान हणमंते हा पाईप टाकून शेतातील पाणी काढून देण्याच्या उद्देशाने नदीकाठावर गेला असता तेथे मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. लागलीच ही माहिती त्यांनी लासोन्याच्या पोलीस पाटलांना दिली. त्यांनी ही माहिती समुद्रवाणीचे पोलीस पाटील नामदेव ननवरे यांना देऊन बेंबळी पोलिसांनाही कळविले. पोलिसांनी लासोना येथील तरुणांच्या सहाय्याने तेरणा नदीपात्रात तरंगत असलेला बबन रसाळ यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. पाच दिवस पाण्यात असल्याने मृतदेह सडला होता. त्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करुन मयतावर लासोना या त्यांच्या गावी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
140721\img20210714143205.jpg
तेरणा नदीपात्रातील प्रेत काढताना लासोना येथील तरुण.