भाजपचे साखळी धरणे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:01 IST2021-02-21T05:01:56+5:302021-02-21T05:01:56+5:30
उस्मानाबाद : भाजपच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी धरणे आंदोलन कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या ...

भाजपचे साखळी धरणे आंदोलन स्थगित
उस्मानाबाद : भाजपच्यावतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले साखळी धरणे आंदोलन कोरोनाचा प्रार्दुभाव व या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनामुळे शनिवारपासून स्थगित करण्यात आले.
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अर्ज करू न शकलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील व भाजप प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली १५ फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू होते. दरम्यान, हे आंदोलन स्थगित केले असले, तरी पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी या गंभीर व संवेदनशील विषयाबाबत तातडीने सर्व संबंधितांची बैठक घ्यावी. तसेच शेतकऱ्यांची ही कैफियत मुख्यमत्र्यांपर्यंत पोहोचवून मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा घडवून न्याय द्यावा. अन्यथा सरकारला शेतकऱ्यांच्या तीव्र आक्रोशाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, यासाठी शेतकऱ्यांसह या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना भेटण्याचा तसेच त्यांनी पीक विम्यासाठी केलेल्या प्रयत्नांबाबत जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत केली जाणार आहे.
शनिवारी आंदोलनाच्या सहाव्यादिवशी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सरचिटणीस नितीन भोसले, आदम शेख, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, भूम तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, भटक्या विमुक्त सेल जिल्हाध्यक्ष सीताराम वनवे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, विनोद गपाट, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, निशिकांत पाटील, दत्ता राजमाने, अमोल पाटील, प्रवीण सलगर, संतोश कस्पटे, किशोर पवार, रामेश्वर शेटे, संतोष सुपेकर, व्यंकट बंडगर, विजय सरडे, प्रवीण चैगुले, नवनाथ मुळे आदी उपस्थित होते.