जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:42+5:302021-05-23T04:31:42+5:30
मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यानंतर मृतांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यामुळे ही बाब ...

जिवावर उदार होऊन मृतदेह हाताळणाऱ्यांना केवळ ४०० रुपये लाभ
मागील वर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. यानंतर मृतांची संख्या हळूहळू वाढू लागली. त्यामुळे ही बाब आरोग्य यंत्रणेने गांभीर्याने घेण्यास सुरुवात केली होती. कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या मृतदेहाला त्याचे नातेवाईकदेखील हात लावत नाहीत. इतकी वाईट स्थिती प्रकर्षाने समोर येत होती. अशा कठीण प्रसंगी मृतदेह उचलणार कोण, हा महत्त्वाचा प्रश्न होता. त्यासाठी वाॅर्डबाॅयची मदत घेणे निश्चित झाले. परिणामी, नवीन वाॅर्डबाॅयची भरती करण्यात आली; आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी त्यांना ४०० रुपयांचे मानधन मिळत असल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे.
प्रतिक्रिया
कोरोनाबाधित व्यक्तीपाशी एक तर कोणी जात नाही. यात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर अधिकच भर पडते. त्या मृतदेहाच्या विल्हेवाटीची जबाबदारी पार पाडूनही पुरेसे मानधन मिळत नाही, याचे दुःख आहे.
- एक वॉर्डबॉय
वाॅर्डबाॅयला कोविड सेंटरमध्ये ६ तास ड्युटी करावी लागत आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करणे, रुग्ण शिफ्ट करणे आदी कामे करावी लागतात. मात्र, त्या तुलनेत दिवसाकाठी केवळ ४०० रुपये मिळत आहेत.
- एक वॉर्डबॉय
कोरोनाचा काळ सुरू असून आमच्या आरोग्याची कोणीही काळजी घेताना दिसत नाही. शिवाय आमच्या कामाचा ताण अधिकच वाढवून ठेवलेला आहे. पॅकिंग आणि शिफ्टिंगचे काम आम्ही करतो; मात्र आमच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
- एक वॉर्डबॉय
इतकी मोठी जबाबदारी सांभाळूनदेखील आमच्या कामाचे कोणीही योग्य मूल्यांकन करीत नाही. आम्हाला पुरेसे मानधन नाही. जे मिळते तेही महिन्याच्या १९ तारखेला मिळते. आरोग्य विभागात कायमस्वरूपी नोकरी द्यावी.
- एक वॉर्डबॉय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटी पद्धतीने भरलेली वाॅर्डबाॅयची पदे : १००
दिवसाला रोजगार : ४००
कंत्राट ३ महिन्यांचे.