कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST2021-06-27T04:21:34+5:302021-06-27T04:21:34+5:30
वाशी : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे तालुक्यातील तेरखेडा येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील एक आणि अन्नपूर्णा मंगल कार्यालयातील एक ...

कंत्राटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
वाशी : कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्यामुळे तालुक्यातील तेरखेडा येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील एक आणि अन्नपूर्णा मंगल कार्यालयातील एक असे तीन कोरोना सेंटर प्रशासनाच्या आदेशानुसार बंद करण्यात आले. यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली असून, त्यांना आरोग्य सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर तालुक्यात चार कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सफाई कामगार, प्रयोगशाळा सहायक, औषध निर्माता, संगणक चालक आदींची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी कामगार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे तेरखेडासह वाशी येथील दोन असे तीन सेंटर बंद करण्यात आले. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ कपिलदेव पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ़ गोवर्धन महेंद्रकर यांनी २५ जून रोजी या २४ कंत्राटी कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या सेवेतून मुक्त केले. यात जालना येथील साई एजन्सीमार्फत आलेले २ सुरक्षारक्षक, १० स्वच्छता कामगार तर कोविड १९ विशेष भरतीतील वैद्यकीय अधिकारी ३, अधिपरिचारिका ४, एएनएम ४, डाटा एन्ट्री ऑपरेटर १ यांचा समावेश आहे.
कोट........
रुग्णसेवेसाठी आम्ही आमच्यासह कुटुंबाचाही जीव धोक्यात घालून काम केले; मात्र कोरोनाची लाट ओसरल्यानंतर कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करण्यात आले. यापुढे देखील जेव्हा गरज भासेल तेव्हा आम्ही कंत्राटी कर्मचारी पुन्हा सेवेत हजर होऊ, परंतु शासनाने आमच्या भविष्याचा व कुटुंबीयाचा विचार करून कायमस्वरूपी सेवेत घेईपर्यंत किमान मानधन नियमित द्यावे, ही अपेक्षा आहे.
- रुपाली निर्मल, हंगामी परिचारिका
रुग्णसेवा ही ईश्वरसेवा म्हणून स्वत:चा व्यवसाय बंद ठेवून कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन कठीण प्रसंगात कंत्राटी कामगारांना सोबत घेऊन कार्य केले. यामधून समाधान मिळाले. मात्र, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली, अशांना आरोग्यसेवेत सामावून घ्यावे. तसेच जोपर्यंत यांना सामावून घेण्यात येत नाही तोपर्यंत मानधन स्वरूपात बेरोजगार भत्ता मिळावा.
- डॉ. किशोर जाधव, खासगी वैद्यकीय व्यावसायिक
कोरोना महामारीच्या संकटसमयी आम्हाला हंगामी कंत्राटी कर्मचाऱ्यांची चांगली मदत झाली. आता शासनाच्या आदेशानुसार त्यांना तात्पुरत्या सेवेतून मुक्त करण्यात येत आहे. या कर्मचाऱ्यांना अनुभव प्रमाणपत्र देऊन कार्यमुक्त केले असून, भविष्यात त्यांना या प्रमाणपत्राचा निश्चित उपयोग होईल़
डॉ. कपिलदेव पाटील, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, वाशी
फोटोओळ- कोरोनाच्या काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना वाशी येथे निरोप देताना वैद्यकीय अधीक्षक डॉ़ कपिलदेव पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी गोवर्धन महिंद्रकर, डॉ़ अमर तानवडे, डॉ़ शेलार व कंत्राटी कर्मचारी.