लिंबाच्या बागेवर कुऱ्हाड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:21 IST2021-07-12T04:21:20+5:302021-07-12T04:21:20+5:30
पुण्याला पाठविलेल्या मालातून वाहतूक खर्चही नाही निघाला मधुकर राऊत तेरखेडा : स्थानिक बाजारपेठेत लिंबाला अपेक्षित दर मिळत नसल्याने ते ...

लिंबाच्या बागेवर कुऱ्हाड !
पुण्याला पाठविलेल्या मालातून वाहतूक खर्चही नाही निघाला
मधुकर राऊत
तेरखेडा : स्थानिक बाजारपेठेत लिंबाला अपेक्षित दर मिळत नसल्याने ते फळ पुण्याच्या बाजारपेठेत पाठविले. परंतु, तेथून मिळालेल्या रकमेतून वाहतूक खर्चही निघाला नसल्याने हताश झालेल्या वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील शेतकऱ्याने अखेर लिंबाच्या बागेवर कुऱ्हाड चालवून बाग नष्ट केली.
बाजारपेठेत मालाला दर कमी मिळणे, पिकावरील रोगराई, नैसर्गिक आपत्ती यामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत आलेला दिसतो. अनेकदा शेती व्यवसायावर कुटुंबाचा उदरनिर्वाह भागविणेही कठीण होते. तेरखेडा येथील शेतकरी विलास पौळ यांनी एका एकरात लिंगाच्या झाडांची लागवड केली होती. याचे चांगल्याप्रकारे संगोपन करून फवारणीसाठीही मोठ्या प्रमाणावर खर्च केला होता. यामुळे लिंबाचे फळही चांगले लागले.
दरम्यान, बाजारपेठेत लिंबाची किंमत अत्यंत कमी झाली. शिवाय, या कमी दरातही खरेदी करण्यासही व्यापरी टाळाटाळ करू लागले. त्यामुळे पौळ यांनी ही लिंबे पुण्याच्या बाजारपेठेत पाठविण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी वाहनातून हे लिंबू पुण्याला विक्रीसाठी पाठविले. परंतु, तिथे पाच रुपये किलो याप्रमाणे दर मिळाल्याने आठ कट्ट्याचे केवळ ८०० रुपये त्यांना मिळाल्याने वाहतूक भाडे ७४० रुपये, मजुरी, हमाली ३०० रुपये गेल्याने त्यांना वाहनाचे पैसे खिशातून द्यावे लागले. शिवाय, फवारणी, खत यावर त्यांचा जवळपास २४ हजारांचा खर्च झाला.
या परिस्थितीमुळे हताश झालेल्या पौळ यांनी अखेर लिंबाच्या बागेवर कुऱ्हाड चालवून संपूर्ण बाग नष्ट केली. दरम्यान दादा मोरे या शेतकऱ्यालादेखील लिंबाच्या विक्रीतून तोटा सहन करावा लागल्याने त्यांनी ही बाग नष्ट केली. यामुळे या दोन्ही शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लाला.
चौकट....
या हंगामात चांगले मोठे फळ लागले होते. त्यामुळे यातून वर्षभरात किमान दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होते. परंतु, बार्शी, लातूर, उस्मानाबाद येथील व्यापाऱ्यांनी दर घसरल्याने खरेदीस नकार दिला. त्यामुळे हे लिंबू पुण्याला पाठविले. मात्र, तिथेही अपेक्षित दर मिळाला नाही. उलट उत्पन्नापेक्षा खर्च अधिक झाल्याने जवळचे पैसे गेले. त्यामुळे शेतातील लिंबाच्या तीनशे झाडांची तोड करून ती बांधावर टाकली.
- विलास पौळ, शेतकरी