देखाव्याच्या माध्यमातून कोरोनाबाबच्या दक्षतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST2021-09-15T04:37:59+5:302021-09-15T04:37:59+5:30

उस्मानाबाद : आरोग्य विभागातील महत्त्वाचा घटक असलेल्या ताकविकी (ता.उस्मानाबाद) येथील एका आशा कार्यकर्तीने घरातील महालक्ष्मीसमोर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा देखावा ...

Awakening of Coronabab's vigilance through the scene | देखाव्याच्या माध्यमातून कोरोनाबाबच्या दक्षतेचा जागर

देखाव्याच्या माध्यमातून कोरोनाबाबच्या दक्षतेचा जागर

उस्मानाबाद : आरोग्य विभागातील महत्त्वाचा घटक असलेल्या ताकविकी (ता.उस्मानाबाद) येथील एका आशा कार्यकर्तीने घरातील महालक्ष्मीसमोर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा देखावा मांडून जनजागृती केली आहे. कोरोनाच्या लढ्यात कर्तव्य बजावणाऱ्या आशा कार्यकर्तीने देखाव्यातून केलेला जागर गावातील महिलांसाठी आकर्षणाचा विषय ठरला आहे.

कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांचे सर्वेक्षण, त्यांचे विलगीकरण करणे, नागरिकांची आरोग्य तपासणी, स्वच्छतेची जनजागृती, गोळ्या-औषधांचे वाटप, ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी यासह इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या जिल्ह्यातील आशा कार्यकर्तींनी कोरोनाच्या काळात पार पाडल्या आहेत. आरोग्य विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणीही आशा कार्यकर्तीकडून केली जात आहे. पाटोदा आरोग्य केंद्रांतर्गत ताकविकी गावातील आशा कार्यकर्ती सारिका शरद निटुरे यांनी महालक्ष्मी सणातही आपले कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे. सारिका निटुरे यांनी कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मदतीने महालक्ष्मी समोर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत जनजागृतीचा देखावा उभारला आहे.

कोरोना काळात प्रत्यक्ष काम करताना आलेले अनुभव, कोरोनाविरूद्धच्या लढ्यात महत्त्वाचा भाग असलेले लसीकरण, स्वच्छता आदी विविध विषयाची माहिती देणारे सूचना फलक महालक्ष्मीसमोर मांडले आहेत. लसीकरण केंद्रावरील नोंदणी करणारी महिला कर्मचारी, लस देणारी परिचारिका, लस घेणारी ज्येष्ठ महिलाही देखाव्यातून उभी करण्यात आली आहे. महालक्ष्मी सणानिमित्त निटुरे यांच्या घरी येणाऱ्या महिलांसाठी हा देखावा आकर्षक ठरत असून, कोरोना प्रतिबंधक लसीकरण आणि उपाययोजनांबाबत महिलांमध्ये जनजागृतीही होत आहे.

कोट

कोरोना काळात प्रत्यक्ष आलेले अनुभव आणि एखाद्या कुटुंबातील कर्ता पुरूष गेल्यानंतर मनाला लागणारा चटका चिंतनीय आहे. त्यामुळेच महालक्ष्मीसमोर कोरोना प्रतिबंधक जनजागृतीचा देखावा तयार करण्याचा संकल्प केला. कुटुंबातील सदस्यांच्या सहकार्याने आणि परिचारिका मुल्ला, ग्रामसेवक कांबळे व इतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हा देखावा पूर्णत्वास आला आहे.

-सारिका शरद निटुरे, आशा कार्यकर्ती, ताकविकी

Web Title: Awakening of Coronabab's vigilance through the scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.