अर्ध्या किमीचे डांबरीकरण दीड महिन्यापासून सुरुच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:30 IST2021-03-25T04:30:35+5:302021-03-25T04:30:35+5:30
उमरगा : शहरातील सर्वात महत्त्वाचा व प्रमुख रस्ता असलेल्या पतंगे रोडच्या डांबरीकरणाचे काम मागील दीड महिन्यापासून सुरू असून, यासाठी ...

अर्ध्या किमीचे डांबरीकरण दीड महिन्यापासून सुरुच
उमरगा : शहरातील सर्वात महत्त्वाचा व प्रमुख रस्ता असलेल्या पतंगे रोडच्या डांबरीकरणाचे काम मागील दीड महिन्यापासून सुरू असून, यासाठी रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे वाहतुकीला अडथळा होऊन वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. शिवाय, रस्त्यालगच्या दुकानात व घरात या रस्त्यावरील उठणाऱ्या धुळीचे थर साचत असून, नागरिकांना धुळीचा त्रास होत आहे.
उमरगा शहरातील सर्वात जास्त रहदारीचा रस्ता म्हणून पतंगे रोडकडे पाहिले जाते. मागील अनेक वर्षापासून या मार्गाचे डांबरीकरण केले गेले नसल्याने रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. पालिकेकडून या रस्त्याबाबत उदासीन भूमिका घेतली जात असल्याने नागरिकांनी मोठे आंदोलन देखील उभे केले होते. अखेर पालिकेने अर्ध्या किमी अंतराच्या रस्ता डांबरीकरणासाठी निधी उपलब्ध केला. मागील वर्षी कोरोनाच्या काळात हे काम सुरू होणार होते. परंतु, गुत्तेदाराने याकडे दुर्लक्ष केले. शेवटी या कामाची मुदत संपल्याने डांबरीकरण करण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गुत्तेदारास काम करण्यास मुदतवाढ देण्यात आली.
दरम्यान, गुत्तेदाराने गेल्या दीड महिन्यापूर्वी काम सुरू केले असून, रस्त्यावर खडी पसरून त्यावर परत मुरूम व खडक असे दोन थर टाकले आहेत. प्रत्येक थर टाकण्यास दहा बारा दिवसाचा कालावधी लावल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असून, सध्या रस्त्याच्या एक बाजुला टाकलेली खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरत आहे. यातच मागील दहा-बारा दिवसापासून काम बंद ठेवल्याने रहदारीस मोठी अडचण होत आहे. या मार्गावर शाळा, दवाखाने, पोष्ट ऑफिस तसेच शहराची ३० टक्के वस्ती या रस्त्यालगतच्या परिसरात आहे. या भागातील नागरिकांना याच रस्त्यावरून मार्गक्रमण करावे लागते. परंतु, अवघ्या अर्धा किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम मागील दीड महिन्यापासून सुरू असल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.
नाल्या नसल्याने पावसाळ्यात अडचण
रस्त्यावर पसलेली खडी वाहनाच्या टायरमुळे उडून इतरांना त्याचा मार बसत आहे. शिवाय खडीवरून वाहने घसरून अपघात देखील होत आहेत. रस्त्यावर खडी व मुरूम खडकाचे तीन थर झाल्याने रस्त्याची उंची वाढली असून, यामुळे रस्त्यालगतची दुकाने व घरे रस्त्याखाली गेली आहेत. रस्त्याच्या बाजुने गटार नसल्याने पावसाचे पाणी या दुकानात व घरात शिरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज रहिवाशांमधून व्यक्त होत आहे.
कोट.......
मागील दीड महिन्यापासून हे काम सुरू असून, गुत्तेदार एवढे संथगतीने काम करीत असताना पालिकेतील पदाधिकारी व अधिकारी मात्र, त्याला पाठिशी घालत आहेत. काम रखडल्याने रहिवाशांची गैरसोय होत असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.
-बाळू कटके, रहिवाशी
या कामाला उशिर झाला, ही बाब खरी आहे. यासंदर्भात गुत्तेदारावर योग्य ती कारवाई करण्यात येईल .लवकरात लवकर काम पूर्ण करण्यासाठी गुत्तेदाराला सांगण्यात आले आहे. येत्या आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात येईल.
-प्रेमलता टोपगे, नगराध्यक्षा