उस्मानाबाद : तालुक्यातील अंबेजवळगा येथील एका तरुणाचा ३१ जुलै रोजी खून झाला होता. या खुनातील चार आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. पाचव्या आरोपीस अटक करण्यात यावी, या मागणीसाठी अंबेजवळगा येथील साबळे कुटूंबीयांनी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
अंबेजवळगा येथील प्रीतम साबळे या तरुणाला गावातील सुरज चांदणे, पवण चांदणे, सौरभ चांदणे, तेजस चांदणे, शेषराव चांदणे अशा पाच जणांनी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन ३१ जुलै रोजी मारहाण करून खून केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. आरोपीच्या मागावर उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक होते. ६ ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे भडाचिवाडी शेत शिवारात आरोपी लपून असल्याची माहिती मिळताच पथकाने भडाचिवाडी शिवारात सापळा रचून आरोपी सुरज चांदणे, पवन चांदणे, तेजस चांदणे, सौरभ चांदणे या चौघांना अटक केली. मात्र, पाचवा आरोपी ३१ ऑगस्टपासून फरार असून त्यास पोलिसांनी अटक करावी, आरोपीस अटक झाल्याशिवाय उपोषण माघे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे. या आंदोलनात मयत प्रीतम याचे वडील राजाभाऊ साबळे, ज्योती साबळे, नाना साबळे, वंदना साबळे, छाया साबळे, उषा साबळे, अभिषेक साबळे, अभिमान साबळे, जीवाजी साबळे, राधाबाई साबळे यांचा सहभाग आहे.