बॅनरवरील फोटोवरून परंड्यात सेनेचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:34+5:302021-07-21T04:22:34+5:30

परंडा (जि. उस्मानाबाद) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सध्या परंडा तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानातील बॅनरवर ...

Army Radha in Parandya from the photo on the banner | बॅनरवरील फोटोवरून परंड्यात सेनेचा राडा

बॅनरवरील फोटोवरून परंड्यात सेनेचा राडा

परंडा (जि. उस्मानाबाद) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार सध्या परंडा तालुक्यात शिवसंपर्क अभियान सुरू आहे. या अभियानातील बॅनरवर माजी आमदाराचा फोटो टाकला नाही, म्हणून संतप्त समर्थकांनी तालुकाप्रमुखावरच हल्ला चढविला. यात जखमी झालेले तालुकाप्रमुख सध्या बार्शीत उपचार घेत आहेत.

१७ जुलै रोजी परंडा तालुक्यातील आसू येथून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली होती. या अभियानाच्या बॅनरवर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचा फोटो न छापल्याने पाटील समर्थक शिवसैनिकांमध्ये मोठा रोष निर्माण झाला होता. हा रोष इतका वाढत गेला की, शेवटी पाटील समर्थक शिवसैनिकांनी मंगळवारी तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव यांच्यावर हल्ला केला.

नव्वदीच्या दशकात शिवसेनेची पाळेमुळे परंडा तालुक्यात रुजवण्यामध्ये ज्ञानेश्वर पाटील यांचा मोठा वाटा होता. त्यांनी गाव-वाडी, वस्त्यांवर शिवसेनेच्या शाखा स्थापन केल्या. याच बळावर ते दोनदा आमदार झाले. काळ बदलत गेला तसे राजकारणही बदलत गेले. मात्र, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा मोठा वर्ग अजूनही तालुक्यात कार्यरत आहे. असे असतानाच शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्यक्रमांमधून माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांना डावलले जात असल्याची भावना त्यांच्या समर्थकांच्या मनामध्ये खदखदत होती. त्यातच कार्यक्रमांच्या बॅनरवरूनही पाटील यांचा फोटो गायब झाल्याने, ही खदखद शेवटी मंगळवारी बाहेर पडली. याला तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव हेच कारणीभूत आहेत, या समजुतीतून परंडा- करमाळा राज्य मार्गावरील एका पेट्रोल पंपाशेजारील हॉटेलमध्ये अण्णासाहेब जाधव चहा पीत बसले असतानाच दुचाकीवरून आलेल्या ६० ते ७० जणांच्या जमावाने अचानक हल्ला केला. लाथा-बुक्क्या, काठी व बेल्टने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये हाताला व डोक्याला गंभीर इजा झाल्याने जाधव यांना आधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर पुढील उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत कोणतीही नोंद झालेली नव्हती.

Web Title: Army Radha in Parandya from the photo on the banner