लोकसहभागातून पालटले अंगणवाड्यांचे रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST2021-04-10T04:31:49+5:302021-04-10T04:31:49+5:30
काक्रंबा : प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘माझे गाव, सुंदर गाव’ या अभियानांतर्गत काक्रंबा येथील पाच अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून अनेक ...

लोकसहभागातून पालटले अंगणवाड्यांचे रूपडे
काक्रंबा : प्रशासनाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘माझे गाव, सुंदर गाव’ या अभियानांतर्गत काक्रंबा येथील पाच अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून अनेक कामे करण्यात आली आहेत. यामुळे येथील अंगणवाड्यांचे रुपडे पालटून गेल्याचे दिसत आहे.
विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेतून प्रत्येक जिल्ह्यात ‘माझे गाव, सुंदर गाव’ हे अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत लोकसहभागातून ‘माझे कार्यालय, सुंदर कार्यालय’ हा उपक्रम जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत सर्व कार्यालयात सुरू आहे. या माध्यमातून अंगणवाडी, जि. प. शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाची रंगरंगोटी करून इतर कामे करण्यात येत आहेत. या कामी सरपंच वर्षा बंडगर, उपसरपंच शरद कानडे, ग्रा. पं. सदस्या निशिगंधा पाटील, समाधान देवगुंडे यांच्या माध्यमातून गावातील पालकांनी अगदी शंभर रुपयांपासून ५ हजार रुपयांपर्यंत देणगी स्वरुपात मदत देऊन अंगणवाडीचे रूपडे पालटले आहे.
येथील प्रत्येक अंगणवाडीमध्ये पक्षी थांबा करून त्यात चारा-पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्याचबरोबर रंगरंगोटी माध्यमातून बोलक्या भिंती करण्यात आल्या आहेत. यातून बालकांना त्या माध्यमातून अध्ययन व्हावे, मनोरंजनात्मक बाराखडी, उजळणी, कविता, बोधपर गोष्टी अशा प्रकारची विविध आकर्षक निसर्गरम्य रंगोटी करून अंगणवाड्या लक्ष वेधून घेत आहेत.
यासाठी सुपरवायझर रोहिणी कुलकर्णी, कार्यकर्ती कांचनगंगा मोरे, सुरेखा देवगुंडे, मंगल क्षीरसागर, निशाली बंडगर, मीरा थोरात, मीरा ढेरे, अलका दळवी, सरस्वती सुरवसे आदींनी पुढाकार घेतला.