धावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:34 IST2021-04-09T04:34:35+5:302021-04-09T04:34:35+5:30
कळंब : येथील कळंब-बार्शी रस्त्यावर एका धावत्या रुग्णवाहिकेच्या इंजीन बॉक्सने पेट घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रसंगावधान राखत ...

धावत्या रुग्णवाहिकेने घेतला पेट
कळंब : येथील कळंब-बार्शी रस्त्यावर एका धावत्या रुग्णवाहिकेच्या इंजीन बॉक्सने पेट घेतल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. प्रसंगावधान राखत आजूबाजूच्या लोकांनी ही आग विझविली. सुदैवाने यात रुग्णही नव्हता आणि कोणास इजाही झाली नाही.
कळंब येथील एका खासगी रुग्णालयाने आपल्या रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चार-पाच दिवसांपूर्वीच आपल्या ताफ्यात रुग्णवाहिका दाखल केली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास सदर रुग्णवाहिका येरमाळा येथून कळंब शहरात दाखल होत होती.
यावेळी खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर धावत असताना शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या समोरील भागात या रुग्णवाहिकेच्या समोरील इंजीन बॉक्समधून धूर निघू लागला. यानंतर चालकाने तत्काळ गाडी बाजूला घेत थांबवली असता धुराने आगीचे रूप धारण केले होते.
यानंतर आजूबाजूचे लोक एकत्र आले. त्यांनी मिळेल त्या साधनाने पाणी उपलब्ध करत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या गाडीलाही पाचारण करण्यात आले होते. या रुग्णवाहिकेत रुग्ण नव्हता. यामुळे कोणताही धोका झाला नाही.