कलेक्टर ऑफिसलाही कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:02+5:302021-04-02T04:34:02+5:30
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची गती वेगाने पुढे सरकत आहे. सर्वसामान्यांसोबतच आता कार्यालयात थांबून काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. ...

कलेक्टर ऑफिसलाही कोरोनाचा विळखा
उस्मानाबाद : कोरोना संसर्गाची गती वेगाने पुढे सरकत आहे. सर्वसामान्यांसोबतच आता कार्यालयात थांबून काम करणाऱ्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. गेल्या दोन दिवसांत एकट्या जिल्हाधिकारी कार्यालयातील १० जण बाधित आले आहेत. त्यामुळे अंतर्गत उपाययोजना सुरू केल्याने नागरिकांनाही सध्या प्रवेश बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात दररोज अडीचशेच्या सरासरीने कोरोनाबाधित आढळून येत आहेत. बुधवारपर्यंत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही १ हजार ८६० इतकी झाली होती. त्यामुळे काही दिवसांनंतर रुग्णालयांतही ऑक्सिजन बेड उपलब्ध राहतील की नाही, याबाबत साशंकता आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनत चाललेली असतानाही नागरिकांचा बाहेरील वावर कमी झालेला दिसत नाही. सुरक्षित अंतराचा नियम तर सर्रास पायदळी तुडविला जात आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला आहे. कामानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांकडून येथेही संसर्गाचा प्रसार झाला आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल १० अधिकारी-कर्मचारी बाधित आले आहेत. पुन्हा त्यांच्या संपर्कातील अन्य कर्मचाऱ्यांची तसेच कुटुंबीयांचीही तपासणी केली जात आहे. यातून आणखी कितीजण पॉझिटिव्ह येतील, हे लवकरच कळेल. कामे महत्ते्वाची आहेतच. मात्र, ती करताना कोरोनाच्या प्रतिबंधासाठी घालून दिलेले साधे नियम पाळले तरी हा संसर्ग टाळता येणे शक्य आहे. सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतर इतके जरी पाळले तरी कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. तसेच आपल्यासह आपल्या कुटुंबीयांचाही जीव धोक्यात घालण्यापासून वाचविता येणे शक्य आहे.
-तर उपाययोजनांसाठीही कोणी नसेल...
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महसूल विभागाकडे मोठे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. बेड, ऑक्सिजन, आरोग्य यंत्रणा, कोविड सेंटर, तेथील सुविधा व अन्य उपाययोजना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून व इतर विभागांना सोबत घेऊन केल्या जात आहेत. आता जिल्हाधिकारी कार्यालयातच असा प्रसार झाल्यास व भविष्यात तो वाढीस लागल्यास सर्वसामान्य रुग्णांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये अडचणी येण्याची शक्यता नाकारता नाही. त्यामुळे सर्वांनीच खबरदारी घेण्याची गरज आहे.
उपाययोजना सुरू, येवा थांबविला...
जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या संसर्गाने शिरकाव केल्यामुळे प्रशासनाने सॅनिटायझेशन सुरू केले आहे. कार्यालयांमध्ये होणारी नागरिकांची अनावश्यक गर्दी कमी करण्यात येत आहे. कामकाज सुरू असले तरी उपाययोजना राबविण्यात येत असल्याने तूर्त नागरिकांना कार्यालयात येण्यापासून थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनीही येथील कामकाजासाठी येण्याचे टाळावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.