अजितदादा उस्मानाबादला, यावेळी थांबा गिरवलीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:23 IST2021-06-18T04:23:27+5:302021-06-18T04:23:27+5:30
उस्मानाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी उस्मानाबादच्या शासकीय दौऱ्यावर आहेत. अशा दौऱ्यात सहसा ब्रेक घेतलाच तर त्यांना ...

अजितदादा उस्मानाबादला, यावेळी थांबा गिरवलीला
उस्मानाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी उस्मानाबादच्या शासकीय दौऱ्यावर आहेत. अशा दौऱ्यात सहसा ब्रेक घेतलाच तर त्यांना हक्काची सासरवाडी आहेच. मात्र, सासरवाडीवर भाजपचा झेंडा लागलेला असल्याने कदाचित यावेळी अजितदादांनी आपला थांबा गिरवलीकडे नेला असावा, अशी चर्चा घडून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे शुक्रवारी दुपारी उस्मानाबादला दाखल होत आहेत. बीडमार्गे येत असल्याने वाटेतच असलेल्या गिरवलीला ते दुपारी १२.४५ ते १.४५ असा तासाभराचा ब्रेक घेणार आहेत. नंतर तेथून ते उस्मानाबादला रवाना होतील. ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना स्थिती व खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत. सायंकाळी ४.३० वाजता पत्रकारांशी संवाद साधून सव्वापाच वाजता ते सोलापूरकडे रवाना होणार आहेत. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच शासकीय दौरा आहे. शिवाय, राष्ट्रवादीच्या पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेल्यानेही या दौऱ्याची विद्यमान पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे.
दरम्यान, माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांचे घर म्हणजे अजितदादांची सासरवाडीच. उस्मानाबाद दौरा असला की ब्रेक घेण्यासाठी त्यांच्यासाठी हक्काचे घर. मात्र, गेल्या विधानसभेला या घराची दारे भाजपसाठी उघडली गेली अन् छतावर कमळाचा झेंडा लागला. असे असले तरी त्यांच्या नात्यातील स्नेहात कटुता आलेली दिसली नाही. तरीही उगाच राजकीय वावड्या उठतील, अशी शक्यता असल्यानेच की काय, यावेळी अजितदादांनी आपला थांबाच बदलला. उस्मानाबाद गाठण्यापूर्वीच ते त्यांचे दुसरे निकटवर्ती नातेवाईक माजी आमदार राहुल मोटे यांच्याकडे थांबणार आहेत. मोटे यांच्या गिरवली येथील निवासस्थानी सुमारे तासभराचा ब्रेक असणार आहे. येथेच जेवण अन् उरलेल्या वेळेत पदाधिकाऱ्यांंशी संवाद साधण्याची शक्यता आहे. उस्मानाबादमधील बैठक, पत्रकार परिषदेनंतर लागलीच ते सोलापूरकडे रवाना होणार असल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी गिरवली गाठून दादांची भेट घेण्याच्या तयारीत आहेत. दादांचा दौरा हा शासकीय असला तरी राजकीय अंगानेही तो ढवळून टाकणारा असेल.
दादा 'घडी' बसवणार का..?
डॉ. पाटील यांचे चिरंजीव भाजपत गेल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यातील घडी विस्कटलेलीच आहे. पदाधिकारी निवडीचे पेच कायम राहिले आहेत. पक्षाला साजेसे असे जिल्हा कार्यालय अजूनही होऊ शकले नाही. काही मोजकेच चेहरे गर्दी करून असल्याने तरुण कार्यकर्ते द्विधावस्थेत आहेत. महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था हातात नाहीत. अशा स्थितीत येत्या वर्षभरात जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुका आहेत. यापार्श्वभूमीवर अजित पवार हे या दौऱ्यात पक्षाची काही घडी बसवणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. इथली गाऱ्हाणी सातत्याने मुंबईपर्यंत पोहोच होत असतातच. त्यामुळे एक घाव दोन तुकडे, असा बाणा असणारे अजितदादा त्याकडे लक्ष देतात का, याचीही कार्यकर्त्यांना उत्सुकता आहेच.