धाराशिव : आगपेटीसह ज्वलनशील पदार्थ घेऊन कार्यालयात प्रवेश करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी बुधवारी १३ जणांवर तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गणेश प्रभाकर पाटील, सोबत १२ महिला व पुरुष २५ फेब्रुवारी रोजी तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या दालनात वीटभट्टीवरील कारवाईसाठी गेले होते. यावेळी त्यांनी प्लास्टिक बाटलीत ज्वलनशील पदार्थ, आगपेटी घेऊन दालनात बेकायदेशीर प्रवेश केला. आगपेटीच्या साह्याने पेटवून घेण्याचा प्रयत्न करत दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले, अशी तक्रार तहसीलदार अरविंद बोळगे यांनी २६ फेब्रुवारी रोजी दिल्याने तुळजापूर ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा दाखल झाला.