उमरग्यात एका दिवसात ११ कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:34+5:302021-03-08T04:30:34+5:30
उमरगा : तालुक्यात शनिवारी एका दिवसात ११ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, ...

उमरग्यात एका दिवसात ११ कोरोनाबाधित
उमरगा : तालुक्यात शनिवारी एका दिवसात ११ कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून, अलीकडील काळात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने उमरगा तालुक्यात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रशासनाने ५ मार्च रोजी पाठविलेल्या २१ स्वॅबचा अहवाल शनिवारी रात्री उशिरा आला. त्यामध्ये आठ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामध्ये तुरोरी येथील २, गुंजोटी २, उमरगा शहरातील शिवपुरी कॉलनीतील ३ व कराळी येथील एकाचा समावेश आहे. यानंतर शनिवारी घेण्यात आलेल्या २८ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये उमरगा पोलीस ठाण्यातील दोघे व एकोंडी मुदगड येथील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. रविवारी पुन्हा ३१ जणांची रॅपिड अँटिजन टेस्ट घेण्यात आली. यातही उमरगा पोलीस ठाण्यातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, शनिवारी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल रविवारी रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे. रविवारी ४६ व्यक्तींचे स्वॅब घेऊन प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. सध्या उमरगा उपजिल्हा रुग्णालयात १८ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, सहा रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
दरम्यान, तालुक्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सामान्य जनता मात्र बेफिकीर आहे. ना मास्कचा वापर, ना फिजिकल डिस्टन्स असे चित्र सर्वत्र दिसत आहे. शहरातील विविध स्तरातील नागरिकांनी यासाठी पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या स्वॅब तपासणी कमी झाली असून, लोक तपासणी करून घेण्यास तयार नाहीत. यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेऊन आपल्या वार्डमधील रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास त्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना तपासणीसाठी प्रवृत्त करावे लागणार आहे. बाजारात बऱ्याच दुकानात सॅनिटायझरची व्यवस्था नाही, येणाऱ्या ग्राहकास मास्क नाही, असे चित्र दिसते. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण सुरू
ज्येष्ठ नागरिकांचे कोविड लसीकरण १ मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. अनेकजण उपजिल्हा रुग्णालयात नोंदणीसाठी येत आहेत. प्रत्येक नोंदणीसाठी साधारण २० ते २५ मिनिटे वेळ जात आहे. त्यामुळे लसीकरणाची संख्या कमी होत आहे. यासाठी स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून रुग्णालयात त्यांना पाठवून द्यावे, असे आवाहन कोविड नोडल अधिकारी डॉ. विक्रम आळंगेकर यांनी केले आहे.