दीर्घकाळ खंड दिल्यानंतर पावसाचे झाले पुनरागमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:12+5:302021-07-07T04:40:12+5:30
उस्मानाबाद : पेरण्यांनंतर दीर्घ काळ खंड दिलेल्या पावसाचे सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुनरागमन झाले आहे. पिके सुकत चालली असताना ...

दीर्घकाळ खंड दिल्यानंतर पावसाचे झाले पुनरागमन
उस्मानाबाद : पेरण्यांनंतर दीर्घ काळ खंड दिलेल्या पावसाचे सोमवारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात पुनरागमन झाले आहे. पिके सुकत चालली असताना दुपारपासून लावलेल्या झडीने आता शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत.
उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी दुपारी पावसाचे आगमन झाले. काहीवेळ मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्यानंतर बराच काळ रिपरिप सुरू होती. या पावसामुळे आसपासच्या शिवारातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शिवाय, शहरातील रस्त्यांवरून, नाल्यांतून पाणी वाहून गेले. उस्मानाबादसोबतच वडगाव सि., सांजा, सारोळा या भागांतही पाऊस झाला. परंडा तालुक्यात केवळ १५ मिनिटे पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्या, तर भूम परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस दुपारच्या सुमारास झाला. आंबी शिवारात सायंकाळी दमदार पावसाला सुरुवात झाली होती. लोहारा शहरासह तालुक्याच्या बहुतांश भागामध्ये अर्धा तास रिमझिम पाऊस सुरू होता. सायंकाळपर्यंत उमरगा तालुक्यातील बलसूर, येणेगूर तसेच उमरगा शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळत होत्या, तर दुसरीकडे याच तालुक्यातील मुरुम परिसरात जोरदार पाऊस सुरू होता. तुळजापूर तालुक्याच्या काही भागांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. दरम्यान, सायंकाळपर्यंत वाशी तालुक्याकडे मात्र पावसाने पाठ फिरवलेली होती.
मुरुम परिसरात ओढे, नाले वाहिले...
उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरात सोमवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शहरानजीकच्या परिसरातून वाहणाऱ्या नाल्यांना पूर आला आहे. मुरूमकडून मधल्या मार्गे अंबरनगर तांड्याकडे कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावरून पुढे सलगरा गावाकडे जाणाऱ्या रोडवरील नाल्याला पूर आल्याने शेतातून तांड्याकडे जाणाऱ्या शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने साखळी करून शेतकऱ्यांनी जीव मुठीत घेत पूल ओलांडला.