वृध्देच्या शोधासाठी प्रशासनाची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:36 IST2021-09-27T04:36:14+5:302021-09-27T04:36:14+5:30
वाशी : रात्री ओढ्यालगत लघुशंकेसाठी गेलेली महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने सकाळपासून शोधाशोध सुरू केली. परंतु, दिवसभर प्रयत्न ...

वृध्देच्या शोधासाठी प्रशासनाची धावपळ
वाशी : रात्री ओढ्यालगत लघुशंकेसाठी गेलेली महिला बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने सकाळपासून शोधाशोध सुरू केली. परंतु, दिवसभर प्रयत्न करूनही महिलेचा शोध न लागल्याने अखेर प्रशासनाला ही शोधमोहीम थांबवावी लागली. हा प्रकार तालुक्यातील वाशी येथे घडला.
वाशी तालुक्यातील फक्राबाद येथील पद्मिनबाई ज्ञानोबा राख (वय ७०) या रविवारी पहाटे चार-साडेचार वाजण्याच्या सुमारास लघुशंकेसाठी बाहेर गेल्या. मात्र, त्या परत आल्याच नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी गावालगतच्या ओढा परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा पत्ता लागला नाही. अखेर सकाळी सरपंच नितीन बिक्कड यांनी तहसीलदार नरसिंग जाधव यांना याची माहिती दिली. तहसीलदार जाधव यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना ही माहिती दिल्यानंतर जिल्हा स्तरावरून पोलीस दलातील आपत्ती व्यवस्थापनचे पथक गावात दाखल झाले. या पथकाने दिवसभर ओढ्याच्या पात्रासह वांजरा नदी डोंगरेवाडीपर्यंत पालथी घातली. मात्र, सायंकाळी सहा वाजेपर्यंतही या महिलेचा शोध लागला नाही. त्यामुळे अखेर ही मोहीम थांबविण्यात आली. गावालगतच्या ओढ्याला रात्री पडलेल्या पावसामुळे पूर आला होता. सकाळी दहा वाजेपर्यंतही पाणी ओसरले नव्हते. अशा स्थितीतही शोधमोहीम राबविल्याचे तहसीलदार जाधव यांनी सांगितले. या शोधमोहिमेसाठी पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर, पोलीस काॅन्स्टेबल नवनाथ सुरवसे, मर्लापल्ले यांच्यासह पोलीस दलाच्या आपत्ती व्यवस्थापनचे पथक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.