कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:22+5:302021-06-20T04:22:22+5:30
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ...

कोठडीत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
उमरगा (जि.उस्मानाबाद) : उमरगा ठाण्याच्या कोठडीत असलेल्या एका आरोपीने हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या आरोपीवर उपचार करून शुक्रवारी रात्री त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील गंगेवाडी येथील आरोपी समाधान रवी चव्हाण ऊर्फ समीर याने हे कृत्य ठाण्याच्या कोठडीत असताना केले. उमरगा तालुक्यातील कवठा येथे मागील वर्षी चोरीची घटना घडली होती. यामध्ये १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता. या प्रकरणात आरोपी असलेला समाधान बेंबळी पोलिसांच्या ताब्यात होता. १५ जून रोजी तीन दिवसांच्या रिमांडवर उमरगा पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात आले होते. दरम्यान, रिमांड संपण्यापूर्वीच आरोपी समाधानने पोलिसांवर दबाव टाकण्याच्या हेतूने कोठडीत असलेल्या स्वच्छतागृहाच्या दरवाजाच्या प्लायवूडचा टोकदार तुकडा काढला. या तुकड्याच्या मदतीने स्वत:च्या डाव्या मनगटावरील नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर त्याने तो तुकडा स्वच्छतागृहातच नष्ट करून टाकला. हा प्रकार लक्षात येताच कर्तव्यावरील पोलिसांनी त्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले. येथे उपचार केल्यानंतर आरोपीस उस्मानाबादच्या जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी उमरगा ठाण्यातील कर्मचारी भागवत घाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीवर कलम ३०९ व २०१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.