इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:31 IST2021-04-06T04:31:48+5:302021-04-06T04:31:48+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करावा
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शनचा मुबलक पुरवठा करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी सोमवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केली. तसेच याबाबत फोनद्वारे चर्चा केली असता, मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन पाठविण्यात येतील, असे सांगितल्याचे जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी सांगितले. या पत्रात त्यांनी म्हणले आहे की, उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. बाधित रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणे गरजेचे आहे. परंतु, सध्या जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांतील औषध दुकानात इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत आहे. कोरोना झालेल्या रुग्णास रेमडेसिवीर इंजेक्शनचे सहा डोस द्यावे लागतात. मात्र, इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची परिस्थिती बिकट होत आहे. काही औषध विक्रेते याचा गैरफायदा घेऊन जास्त किमतीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करीत आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय, खासगी रुग्णालयांत व औषधी दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तात्काळ पुरवठा करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली.
तसेच जिल्ह्यात औषध विक्रेते, होलसेलर यांच्याकडे किती इंजेक्शन उपलब्ध आहेत, याची माहिती दररोज अन्न व औषध प्रशासनाकडून सार्वजनिक करण्यात यावी, अशीही मागणी जिल्हाध्यक्ष बिराजदार यांनी केली आहे.