फरार रोचकरीला अखेर मुंबईतून उचलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:20+5:302021-08-19T04:35:20+5:30
उस्मानाबाद/तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्राचीन तीर्थकुंड हडप करून त्यावर बांधकामाचा घाट घातलेल्या आरोपी देवानंद रोचकरीवर आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल झाला ...

फरार रोचकरीला अखेर मुंबईतून उचलले
उस्मानाबाद/तुळजापूर : तीर्थक्षेत्र तुळजापुरातील प्राचीन तीर्थकुंड हडप करून त्यावर बांधकामाचा घाट घातलेल्या आरोपी देवानंद रोचकरीवर आठवडाभरापूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच पसार झालेल्या रोचकरीच्या मागावर पोलिसांची दोन पथके होती. अखेर बुधवारी दुपारी तो मुंबईतील आमदार निवासाच्या कँटीनजवळ थांबलेला असताना पथकाने त्यास ताब्यात घेतले.
तुळजापूर शहरातील मंकावती तीर्थकुंड हे प्राचीन असून, त्याचा उल्लेख विविध पुराणातही आढळूनही येतो. असे असतानाही तुळजापुरातीलच देवानंद रोचकरी याने या तीर्थकुंडावर मालकी हक्क सांगितला होता. तीर्थकुंडास विहीर संबोधून ती आपल्या पूर्वजांची मिळकत असल्याचा दावा करीत त्याने यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे कब्जा केला. यासंदर्भात तक्रारी झाल्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चौकशी करून समितीच्या अहवालाद्वारे रोचकरीवर फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. या कारवाईला रोचकरीने नगरविकास खात्याकडून स्थिगितीही मिळविली होती. मात्र, त्यावर तत्काळ सुनावणी घेऊन स्थगिती आदेश मागे घेत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नगरविकासने कायम ठेवले. १० ऑगस्ट रोजी याबाबतचे आदेश निर्गमित होताच इकडे रातोरात प्रशासनाने पोलीस ठाणे गाठून बनावट कागदपत्रे तयार करीत ऐतिहासिक वारसा असणारी शासकीय जागा हडप केल्याबद्दल देवानंद रोचकरी व त्याचा भाऊ बाळासाहेब रोचकरीवर गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याची माहिती कळताच आरोपी रोचकरी तुळजापुरातून पसार झाला. राजाश्रयाच्या शोधात त्याने मुंबई गाठली. इकडे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या सूचनेनुसार निरीक्षक अजिनाथ काशिद यांनी पोलिसांची दोन पथके तयार करून त्याच्या मागावर साेडले होते. दरम्यान, बुधवारी रोचकरी हा मुंबईतील आमदार निवासच्या कँटीनजवळ थांबला असल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक राहुल रोटे, कर्मचारी अजय सोनवणे, अमोल पवार यांच्या पथकाने कँटीन परिसर गाठून रोचकरीला ताब्यात घेतले. आता पुढील प्रक्रिया पार पाडून गुरुवारी पहाटेपर्यंत त्यास तुळजापुरात आणले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.