पशुंच्या लसीकरणासाठी घोड्यावरून गाठले गाव; चिखलमय रस्त्यामुळे वाहन जाणे अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 05:40 PM2022-09-21T17:40:53+5:302022-09-21T17:41:01+5:30

जनावरांमध्ये बळावत असलेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत सध्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाला लसीकरण केले जात आहे.

A man reached village on horseback to vaccinate cattle; Impossible to drive due to muddy road | पशुंच्या लसीकरणासाठी घोड्यावरून गाठले गाव; चिखलमय रस्त्यामुळे वाहन जाणे अशक्य

पशुंच्या लसीकरणासाठी घोड्यावरून गाठले गाव; चिखलमय रस्त्यामुळे वाहन जाणे अशक्य

googlenewsNext

पारगाव: जनावरांमध्ये बळावत असलेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत सध्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुधनाला लसीकरण केले जात आहे. परंतु, वाशी तालुक्यातील बाराते वस्तीकडे जाणारा रस्ता संपूर्ण चिखलमय झाल्यामुळे वस्तीपर्यंत पोहोचणे जिकीरीचे झाले आहे. अशा स्थितीत येथील पशुधन विकास अधिकारी ज्ञानेश्वर बाबर यांनी घोड्यावर टाच मारून वस्ती गाठून ४५० पशुधनांचे लसीकरण केले.

या भागातील बहुतांश शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. यामुळे या परिसरात पशुधनाची संख्या मोठी आहे. या पशुधनाचे आरोग्य राखण्यासाठी पारगावात पशुवैद्यकीय दवाखाना असून, याअंतर्गत पारगावसह, जनकापूर, हातोला, रुई, लोणखस, जेबा, ब्रह्मगाव, पांगरी, घाटपिंपरी ही गावे येतात. या गावातील पशुधनाची संख्या ४ हजार ३०० इतकी आहे.

सध्या सर्वत्र लम्पी संकीनचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाने पशुधनाच्या लसीकरणाची मोहीम युध्दपातळीवर हाती घेतली आहे. पारगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत एकूण ४ हजार ३०० पैकी ३ हजार ४०० पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित लसीकरणही सुरु आहे. दरम्यान, बुधवारी जनकापूर गावातील बाराते वस्ती वरील पशुधनाच्या लसीकरणाचे नियोजन पशु विभागाने केले होते. परंतु, या रस्तीकडे रस्ता चिखलमय असल्याने कुठलेही वाहन जाणे शक्य नव्हते.

अशा स्थितीत पशुधन विकास अधिकारी ज्ञानेश्वर बाबर यांनी जनकापूर येथील शेतकऱ्यांकडे असलेल्या घोड्याची मदत घेत त्यावर बसून बाराते वस्ती गाठली. या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने ४५० पशुधनाला लस दिली. पशुधन अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या कार्यतत्परळेमुळे पशुपालकातुन समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: A man reached village on horseback to vaccinate cattle; Impossible to drive due to muddy road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.