बिनविरोध ग्रामपंचायतीस देणार ६० लाख निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:22 IST2021-01-01T04:22:14+5:302021-01-01T04:22:14+5:30
उस्मानाबाद : सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत गावातील निकोप वातावरण कायम राखण्यासाठी व या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी ...

बिनविरोध ग्रामपंचायतीस देणार ६० लाख निधी
उस्मानाबाद : सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत गावातील निकोप वातावरण कायम राखण्यासाठी व या माध्यमातून गावाचा विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधींकडून भरघोस निधी देण्याची घोषणा केली जात आहे. आ.राणाजगजितसिंह पाटील यांनीही सदस्य संख्येनुसार ६० लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्याचे गुरुवारी जाहीर केले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू असून, छाननी नंतर वैध नामनिर्देशित उमेदवारांची नावे व संख्या निश्चित झाली आहे. ४ जानेवारीपर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची मुदत आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा हा खऱ्या अर्थाने योग्य कालावधी आहे. गावाच्या विकास प्रक्रियेला गती व प्रोत्साहन मिळण्यासाठी निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे असून, अशा पुढाकार घेतलेल्या ग्रामपंचायतींना सदस्यांच्या संख्येनुसार ६० लाख रुपयांपर्यंतचा निधी देण्याचे आ. पाटील यांनी जाहीर केले. दरम्यान, यासाठी त्यांनी मतदारसंघाची सीमारेषा आखलेली नाही. जिल्ह्यातील कोणतीही ग्रामपंचायत बिनविरोध निघत असेल तर त्या गावास हा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ग्रामस्थांनी आपले गाव बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे, तसेच प्रयत्न सुरू असलेल्या ग्रामपंचायतींनी मदतीसाठी उस्मानाबाद शहरातील प्रतिष्ठान भवन येथे संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
कुठे, कसा, किती देणार...
बिनविरोध निघालेल्या ग्रामपंचायतींना विधिमंडळ सदस्य व संसद सदस्यांच्या स्थानिक विकास निधी बरोबरच जिल्हा नियोजन समिती, जिल्हा परिषद व इतर शासकीय योजनांसह आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ९ पर्यंत सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतींना २५ लाख रुपये, ११ ते १५ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना ४० लाख तर १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतींना ६० लाख रुपये विकास निधी प्राधान्याने उपलब्ध करून देण्यावर भर राहील, असे आ.पाटील यांनी कळविले आहे.