५५० गावांनी रोखली कोरोनाची वाट, ७ गावे हॉटस्पॉट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:35 IST2021-08-19T04:35:24+5:302021-08-19T04:35:24+5:30
उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा बसल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा यातून लवकर सावरला आहे. आजघडीला जिल्ह्यातील ५५० गावांनी कोरोनाची ...

५५० गावांनी रोखली कोरोनाची वाट, ७ गावे हॉटस्पॉट
उस्मानाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबर तडाखा बसल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा यातून लवकर सावरला आहे. आजघडीला जिल्ह्यातील ५५० गावांनी कोरोनाची वाट रोखून धरली आहे. या गावांमध्ये सध्या एकही कोरोनाचा रुग्ण नाही, तर केवळ ७ गावांमध्ये १० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्यविषयक सोयी-सुविधांबाबतीत अत्यंत रसातळाला असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांनी जीव गमावले. पहिल्या लाटेतून बोध घेत आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. दुसरी लाट पाठोपाठच आल्याने सर्व सुविधा तयार झाल्या नव्हत्या. मात्र, आता तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी बऱ्यापैकी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. अजूनही तयार होत आहेत. त्यामुळे चिंता कमी झाल्या आहेत. दरम्यान, तिसरी लाट रोखण्यासाठी सध्या आरोग्य विभागाकडून जेथे रुग्ण आढळून येतील, त्या भागावर किंवा गावावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. तेथील चाचण्या वाढविल्या जात आहेत. यामुळे बाधित लवकर ट्रेस होऊ लागले आहेत. परिणामी, संसर्ग प्रसाराच्या वेगावर नियंत्रण मिळविता येणे शक्य झाले आहे. यामुळेच जिल्ह्यातील ५५० गावांत आज एकही रुग्ण नाही, तर १६१ गावांत १ ते ५ रुग्ण आहेत. १४ गावांत ५ ते १०, तर केवळ ७ गावांत १० पेक्षा अधिक रुग्ण आहेत.
दररोज दीड हजारांवर चाचण्या...
रुग्ण आढळून येताच त्या भागातील चाचण्या वाढविल्या जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज दीड हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. यातून सरासरी ६० ते ७० रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. पॉझिटिव्हिटी रेट हा कधी ४, तर कधी ३ टक्के असा येतोय. दोन दिवसांपासून यातही किंचित घट दिसून येत आहे.
या गावांमध्ये आहेत १० पेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण...
तालुका गाव रुग्णसंख्या
उस्मानाबाद उस्मानाबाद ४७
वाशी पिंपळगाव ११
वाशी वाशी २३
भूम मात्रेवाडी २५
परंडा डोंजा ११
परंडा खासापुरी १२
परंडा कुंभेजा ४१