उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात नाशिकच्या मुक्त विद्यापीठांतर्गत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिकेला मंजुरी देण्यात आली आहे. यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे केली.
खासदार ओम राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी सामंत यांच्याकडे अभ्यासिकेसाठीची मागणी केली होती. नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी पालिकेच्या माध्यमातून जागा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. ही बाब लक्षात घेत सामंत यांनी उस्मानाबाद शहरातील या अभ्यासिकेसाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच या भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी उस्मानाबादेत जागा उपलब्ध आहे. नव्याने जागा शोधण्याची गरज नाही. त्यामुळे सुमारे २० ते २५ कोटी रुपये खर्च करुन तंत्रशिक्षण मंडळाच्या माध्यमातून येथे गुणवत्ता वाढीसाठी नवे अभ्यासक्रम सुरु करण्याबाबत येत्या ६ महिन्यात निर्णय घेतला जाईल, असे सामंत म्हणाले.
विद्यापीठासाठी महिनाभरात बैठक...
उस्मानाबादला स्वतंत्र विद्यापीठ व्हावे, असे सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींची भावना आहे. ही भावना मी लवकरच मुख्यमंत्र्यांकडे मांडतो व येत्या महिनाभरात याविषयी बैठक लावू, असे सामंत यांनी आश्वासित केले. ते म्हणाले, गतवर्षी याबाबत प्रयत्न केले होते; मात्र काही गैरसमज निर्माण झाले होते. केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण आणले आहे. राज्यानेही याविषयी डॉ.रघुनाथ माशेलकर यांची समिती स्थापन केली आहे. या समितीचा अहवाल व केंद्राचे धोरण सुसंगत ठरले तर निर्णयास अडचण येणार नाही, असे सामंत यांनी उस्मानाबादच्या स्वतंत्र विद्यापीठाविषयी स्पष्ट केले.