- संतोष वीरभूम (जि. धाराशिव) : रस्त्यावरील गतिरोधकावर पांढरे पट्टे व माहिती फलक न लावल्याने अपघाताची घटना १५ जुलै रोजी रात्री ९ वाजता भूम शहरात घडली होती. या अपघातात वाहनाचे नुकसान झाल्याने त्याला जबाबदार शाखा अभियंता, ठेकेदार व धडक देणाऱ्या वाहनधारकावर १७ जुलै रोजी रात्री भूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भूम तालुक्यातील सोनगिरी येथील शिवाजी काळे हे त्यांच्या चारचाकी वाहनात इंधन भरण्यासाठी १५ जुलैच्या रात्री ९ वाजता भूम शहरातील ओंकार चौकातून पंपाकडे जात होते. दरम्यान, ज्या रस्त्याने ते निघाले होते, त्यावर मोठ्या आकाराचे गतिरोधक तयार करण्यात आले आहेत. मात्र, त्यावर पांढरे पट्टे ओढलेले नाहीत. शिवाय, बाजूला गतिरोधक दर्शवणारा फलकही बसविण्यात आलेला नाही. त्यामुळे ऐन गतिरोधकाजवळ गेल्यानंतर ते लक्षात आल्याने शिवाजी काळे यांनी अचानक ब्रेक दाबला. यामुळे पाठीमागून येत असलेल्या चारचाकी वाहनाची काळे यांच्या वाहनाला धडक बसली. यामध्ये त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. या अपघाताला बांधकाम विभागाचे शाखा अभियंता, रस्ता तयार करणारे ठेकेदार व धडक देणारा वाहनचालक जबाबदार असल्याची तक्रार शिवाजी काळे यांनी १७ जुलै रोजी भूम पोलिस ठाण्यात केली. या तक्रारीनुसार तिघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या कलमानुसार गुन्ह्याची नोंदया गुन्ह्यात आरोपींवर तीन कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात या कलमांचा समावेश आहे. बीएनएसचे कलम ३२४ (४) - खोडसाळपणे इतरांच्या मालमत्ता, व्यक्तीचे नुकसान करणे. कलम २८१ - बेदरकारपणे वाहन चालवून मानवी जीवन धोक्यात आणणे. कलम २८५ - सार्वजनिक मार्गांवर अडथळा निर्माण करणे.
महिन्यात ५ अपघात झालेमागील एक महिन्याच्या कालावधीत संबंधित रस्त्यावरून भरधाव वेगाने दुचाकी व चारचाकी वाहने धावत असल्याने ५ अपघात झाले होते. यामुळे शहरातील नागरिकांनी गतिरोधक बसविण्याची मागणी केली होती. त्यानुसार ते बसविण्यात आले. यावर तातडीने पांढरे पट्टे व रस्त्याशेजारी माहिती फलक लावण्यात येतील.- रमेश गिराम, उपअभियंता, सा. बां., भूम