भूममध्ये ३१ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:22 AM2021-06-19T04:22:02+5:302021-06-19T04:22:02+5:30

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात ...

31% sowing is completed in the land | भूममध्ये ३१ टक्के पेरण्या पूर्ण

भूममध्ये ३१ टक्के पेरण्या पूर्ण

googlenewsNext

भूम : यंदा तालुक्यात पावसाने चांगली सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी चाढ्यावर मूठ धरली असून, तालुक्यात १५ जून अखेर ३१ टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या हंगामात शेतकऱ्यांनी उडीद, सोयाबीन या पिकास अधिक पसंती दिल्याचे सध्या सुरु आसलेल्या पेरण्यांवरुन दिसून येत आहे.

यंदा तालुक्यात महाबीजच्या बहुतांश बियाणाचा सुरूवातीपासूनच तुटवडा असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. त्यात पुन्हा गतवर्षीचा पीक विमा न मिळाल्याने तसेच कोरोनामुळे आर्थिक अडचणही आहेच. सध्या उसनवारी करुन बी-बियाणाची जुळवाजुळव करत खरिपातून काहीतरी उत्पन्न हाती लागेल, या आशेने शेतकरी पेरणी करताना दिसत आहे.

तालुक्यात खरिपाचे ४९ हजार ३८६ हेक्टर क्षेत्र असून, गेल्या पाच-सहा दिवसापूर्वी चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप पेरणीस प्रारंभ केला. सुरूवातीपासूनच सोयाबीनचा तुटवडा असल्याने मिळेल त्या कंपनीचे व घरगुती बियाणाची जुळवाजुळव शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात पाच मंडळापैकी अंबी मंडळात १३५.२० मिमी, याखालोखाल माणकेश्वर मंडळात ११८ मिमी तसेच भूम मंडळाच्या काही भागात पाऊस झाल्याने या भागात पेरण्या सुरु आहेत. वालवड व ईट मंडळात मात्र अद्याप पाऊस कमी असल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र सरासरी ४९ हजार ३८६ हेक्टर असून, १५ जून अखेर १४ हजार ९८९ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. या हंगामात ज्वारी ५३५.४५ हेक्टर, बाजरी १ हजार ६४७.९४ हेक्टर,, मका २५०० हेक्टर, तूर ९ हजार ७०० हेक्टर, उडीद ८ हजार २०० हेक्टर, मूग ३ हजार ५०० हेक्टर, तीळ ३५० हेक्टर, सोयाबीन १५ हजार ५०० हेक्टर, सूर्यफूल ५२३ हेक्टर, कारळे १०९ हेक्टर, तर कापूस ४ हजार ५३१ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. तालुक्यात यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी सध्या तरी उडीद पिकास पसंती दिली असून, याचे सरासरी क्षेत्र ८ हजार २०० हेक्टर असताना सध्या ४ हजार १०० हेक्टरवर म्हणजेच ५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यापाठोपाठ सोयाबीन पिकास पसंती दिल्याचे दिसत आहे. यंदा कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ हजार ५३१ हेक्टर असले तरी आतापर्यंत केवळ १० हेक्टर म्हणजेच २२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असल्याची माहिती मंडळ कृषी अधिकारी निखील रायकर यांनी दिली.

Web Title: 31% sowing is completed in the land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.