जिल्ह्यातील ३० सीसीसी सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:22 IST2021-06-24T04:22:35+5:302021-06-24T04:22:35+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आवठड्यापासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात धडकली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने ...

जिल्ह्यातील ३० सीसीसी सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद
उस्मानाबाद : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आवठड्यापासून कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात धडकली होती. त्यामुळे रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने प्रशासनाकडून ४५ कोविड केअर सेंटर कार्यान्वित केले होते. या सेंटरवर कंत्राटी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत होते. जून महिन्यात रुग्णांची संख्या कमी होऊ लागल्याने प्रशासनाने ३० केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सेंटर्सवर नियुक्त असलेल्या सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली आहे.
गतवर्षी जून महिन्यापासून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली होती. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येत होता. रुग्णालयातील बेडही अपुरे पडत होते. रुग्णांची गैरसोय टाळण्याकरिता आरोग्य विभागाकडून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले होते. या केंद्रावर डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय असे कर्मचारी तीन महिन्याच्या कंत्राटी स्वरुपावर नेमणूक करण्यात आली होती. डिसेंबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी झाल्याने काही ठिकाणचे केंद्र बंद करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा रुग्णांची संख्या वाढू लागली. मार्च, एप्रिल महिन्यांपासून रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे बंद करण्यात आलेले केंद्र कार्यान्वित करण्यात आले. या केंद्रावर डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, असे सुमारे सातशेच्या जवळ कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. रुग्ण कमी होऊ लागल्याने ३० केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या केंद्रावर कार्यरत असलेले सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.
हे सेंटर होणार बंद
उस्मानाबाद येथील तेरणा पब्लिक स्कूल, ज्युनिअर मुलांचे वसतिगृह, तेरणा पब्लिक स्कूल, सिनिअर मुलांचे वसतिगृह, पवनराजे फाउंडेशनमार्फत समर्थ मंगल कार्यालय, तेरणा पब्लिक स्कूल, मुलींचे वसतिगृह, वकिंग वुमन्स हॉस्टेल, तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नवीन मुलांचे वसतिगृह, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचेमार्फत जुन्या संजीवन हॉस्पिटलमधील केंद्र बंद होणार आहे.
तुळजापूर येथील नवीन भक्त निवास, सैनिक विद्यालय, श्री छत्रपती शिवाजी कॉलेजमधील मुलींचे वसतिगृह, उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी कॉलेज मुलींचे वसतिगृह, ईदगाह मैदान कोविड केअर सेंटर, माऊली मंगल कर्यालय, ज्ञानदीप विद्यालय डाळिंब.
भूम येथील ए. पी. कॉलेज मुलींचे वसतिगृह, गजानन महाराज मंदिर देवस्थान, रवींद्र हायस्कूल,
परंडा येथील संत मीरा पब्लिक स्कूल, रा. गे. शिंदे मुलींचे वसतिगृह, प्रीतम मंगल कार्यालय, सोनारी येथील काळभैरवनाथ भक्त निवास.
कळंब येथील सोजर मतिमंद मुलांचे विद्यालय, रायगड मंगल कार्यालय, डिकसळ येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालय.
वाशी कर्मवीर मामासाहेब जगदाळेे मुलींचे वसतिगृह, अन्नपूर्णा मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तेरखेडा, बालाजी मंगल कार्यालय.
लोहारा शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,
माकणी येथील भारत शिक्षण संस्थेचे कला विज्ञान महाविद्यालय.
१५ केंद्रे राहणार सुरू
उस्मानाबाद शहरातील ३, तुळजापूर २, उमरगा २, मुरुम १, भूम २, परंडा १, कळंब २, वाशी १, लोहारा शहरातील १ असे १५ सीसीसी सुरू राहणार असून, या सेंटरवर १७२५ बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.