२५ शेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:46+5:302021-04-02T04:33:46+5:30

लोहारा : कृषी क्षेत्रात शेत रस्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेत रस्त्यावरील अतिक्रमणे हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा असतो. ...

25 farm roads took a deep breath | २५ शेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

२५ शेत रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

लोहारा : कृषी क्षेत्रात शेत रस्त्यांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेत रस्त्यावरील अतिक्रमणे हा ग्रामीण भागातील कळीचा मुद्दा असतो. शेत रस्ता नसेल तर शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हिच बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यात शेत रस्ते अतिक्रमण मुक्तीची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत लोहारा तालुक्यातील २१ किमीच्या २५ शेत रस्त्यांची मोकळा श्वास घेतला आहे.

ग्रामीण भागामध्ये शेत रस्त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आजही कायम आहे. बऱ्याच गावामध्ये नकाशावर शेत रस्ते आहेत, परंतु, प्रत्यक्षात अतिक्रमणांमुळे या शेत रस्त्यांची पाऊलवाट झाली आहे. यामुळे शेताकडे ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्यांना विलंब होतो. शेतातील माल घराकडे घेऊन जाणेही जिकिरीचे होऊन बसते. अनेक शेतकऱ्यांना शेतात नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा असतानाही रस्त्याची सुविधा नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत. शेतरस्ता मिळावा, यासाठी अनेक शेतकऱ्यांचे अर्ज प्रशासनाकडे पडून आहेत. काही प्रकरणे न्यायालयातही प्रलंबित आहेत. अनेक ठिकाणी शेत रस्त्याच्या कारणावरुन वादही होतात.

एकूणच शेतीचा विकास करायचा असेल तर शेतरस्ता महत्त्वाचा आहे. हिच बाब लक्षात घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतरस्ते सामोपचारातून अतिक्रमणमुक्त करण्याची लोकचळवळ हाती घेतली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना सूचना देण्यात आल्या असून, महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष रस्त्याच्या ठिकाणी जाऊन, शेतकऱ्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावत आहेत.

लोहारा येथील तहसीलदार संतोष रुईकर यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तालुक्यात शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ प्रभावीपणे सुरु केली आहे. आतापर्यंत तालुक्यातील २१ किमीचे २५ शेत रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. यामध्ये लोहारा मंडळातील आरणी, भातागळी, कानेगाव,नागराळ, कास्ती (बु) यासह आदी गावातील १२.८ किमीचे १८ शेतरस्ते मोकळे करण्यात आले आहेत. याशिवाय जेवळी मंडळातील दस्तापूर, भोसगा, कोळनूर, पांढरी या गावातील २.५ किमीचे तर माकणी मंडळातील एकोंडी (लो), होळी येथील ६ किमीचे तीन शेतरस्ते मोकळे करण्यात महसूल प्रशासनाला यश मिळाले आहे. यामुळे मागील अनेक वर्षांपासून शेत रस्तासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहेत.

लोहारा तालुक्यातील तीन महसूल मंडल निहाय शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम सुरु असून यासाठी तहसीलदार संतोष रुईकर, लोहारा मंडल अधिकारी बी. एस. भरनाळे, माकणी मंडल अधिकारी शहाजी साळुंके, जेवळी मंडल अधिकारी एम. एस. स्वामी तसेच गावस्तरावर तलाठी, पोलीस पाटील हे प्रयत्नशील आहेत.

लोहारा तालुक्यातील मागील २५ ते ३० वर्षांपासून अतिक्रमण केलेले शेतरस्ते जिल्हाधिकारी यांच्या अतिक्रमण मुक्तीच्या लोकचळवळीतून मुक्त करण्यात आले आहेत. यामुळे शेतकऱ्यात होणारे वाद थांबतील. ही चळवळ सर्वच रस्ते अतिक्रमण मुक्त करेपर्यंत कायम राबवावी.

- ॲड. दादासाहेब पाटील, लोहारा

जिल्हाधिकारी शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ राबत आहेत. त्यामुळे भातागळी येथील गेले ३० वर्षांपासून अतिक्रमित असलेला अडीच किमीचा शेतरस्ता देखील आता मोकळा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा झाला फायदा आहे.

- गणेश फत्तेपुरे, शेतकरी, भातागळी

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार लोहारा तालुक्यात शेतरस्ते अतिक्रमण मुक्तीची लोकचळवळ सुरु केली असून, आतापर्यंत २५ शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत. अजून ८ ते १० शेतरस्ते लवकरच अतिक्रमण मुक्त होतील. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

- संतोष रुईकर, तहसीलदार, लोहारा

Web Title: 25 farm roads took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.