लोकसहभागातून उभारणार २५ बेडचे कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST2021-04-20T04:33:59+5:302021-04-20T04:33:59+5:30
लोहारा : तालुक्यातील माकणी येथे कोरोना रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, बहुतांश ठिकाणी आता बेड मिळणेही मुश्कील झाले ...

लोकसहभागातून उभारणार २५ बेडचे कोविड सेंटर
लोहारा : तालुक्यातील माकणी येथे कोरोना रुग्णांत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून, बहुतांश ठिकाणी आता बेड मिळणेही मुश्कील झाले आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातच लोकसहभागातून २५ बेड व ऑक्सिजनची व्यवस्था असलेले कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय माकणी ग्रामपंचायतीने घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्तावदेखील पंचायत समितीकडे दाखल करण्यात आला आहे.
माकणी येथे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढत चालली आहे. येथे १५० पेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून यात तिघांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५० पेक्षा जास्त कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे कोरोनाची टेस्ट करण्यात येत आहे. यातही अनेक रुग्ण आढळून येत आहेत. गावातील बाधित निघालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकांना लोहारा, तुळजापूर, उस्मानाबाद येथे नेण्यात येत आहे. परंतु, तेथेही रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अनेकदा वेळेवर बेड,औषधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.
ही बाब लक्षात घेऊन गावातच कोरोना रुग्णांची सोय व्हावी यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. के. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून गावातच २५ बेडची व्यवस्था व ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सरपंच विठ्ठल साठे यांनी रविवारी ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. यासाठी गावातील सर्व शाळेतील मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. हे कोविड सेंटर बीएसएस कला वाणिज्य महाविद्यालयाच्या पहिल्या मजल्यावर उभारण्यात येणार असून, यासाठीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केला असल्याचेही सरपंच साठे यांनी सांगितले.
चौकट.......
लसीबाबत सर्वेक्षण करण्याच्या सूचना
प्रत्येक ग्रामस्थाने कोरोनाची लस घ्यावी. तसेच इतरांनाही लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे. आशा कार्यकर्ती व अंगणवाडी कार्यकर्ती यांनी घरोघरी जाऊन कोणी लस घेतली, कोणी नाही याचा सर्व्हे करावा. कोणाला बरे वाटत नसेल तर त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी सांगावे, अशा सूचना सरपंच साठे यांनी यावेळी केल्या. वैद्यकीय अधिकारी माने यांनी ग्रामपंचायतीने घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे सांगितले. यावेळी उपसरपंच वामन भोरे, माजी उपसरपंच दादासाहेब मुळे, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन आलमले, सरदार मुजावर, अभिमन्यू कुसळकर, बाळू कांबळे, ग्रामविकास अधिकारी जगताप यांच्यासह आशा कार्यकर्त्या, अंगणवाडीच्या कार्यकर्त्या आदी उपस्थित होते.