तीन मंडळांसाठी १९ कोटींच्या मदतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:48+5:302021-03-07T04:29:48+5:30

कळंब : गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक गावातील शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित क्षेत्रासाठी गोविंदपूर, ...

19 crore aid process for three boards in final stage | तीन मंडळांसाठी १९ कोटींच्या मदतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

तीन मंडळांसाठी १९ कोटींच्या मदतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात

कळंब : गतवर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीने अनेक गावातील शेती क्षेत्राचे मोठे नुकसान झाले होते. या बाधित क्षेत्रासाठी गोविंदपूर, शिराढोण व नायगाव मंडळातील तीसपेक्षा जास्त महसुली गावातील शेतकऱ्यांना तब्बल १९ कोटी २५ लक्ष रुपयाची आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात असून, येत्या १० दिवसात शेतकऱ्यांच्या हाती ही रक्कम पडणार आहे.

गतवर्षी रब्बी हंगाम भरात असतानाच ताालुक्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता. यावेळी गारपीट व वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील हाती आलेली पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले होते. यात रब्बीच्या नियमित पिकासोबतच बहुवार्षिक फळपिकांचाही काटा निघाला होता.

यानंतर या नैसर्गिक आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी पुढे आली होती. या कामी लोकप्रतिनिधीह शासनस्तरावर पाठपुरावा केला होता. दरम्यान, गावपातळीवरच्या कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवक यांच्या संयुक्त पंचनाम्याची कार्यवाही होऊन झालेल्या नुकसानीचा अहवाल तहसीलदारांनी वरिष्ठ प्रशासनाला पाठवला होता.

यानुसार मागच्या काही महिन्यात राज्य सरकारने यासाठी ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपदा मदत धोरणानुसार आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयास यातून निधी प्राप्त झाला होता. यापैकी कळंब तालुक्यासाठीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने तहसीलकडे बिम्स प्रणालीद्वारे वर्ग केला आहे.

यानुसार बँक खातेक्रमांक असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तहसील कार्यालयाने प्राप्त केल्या होत्या. यात समाविष्ट असलेल्या बाधित क्षेत्रासाठी त्या-त्या शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर आर्थिक मदतीची रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. आगामी १० दिवसात सर्व शेतकऱ्यांना ही रक्कम मिळून जाईल, असे तहसीलदार रोहन शिंदे यांनी सांगितले.

२३ हजार हेक्टर क्षेत्र झाले बाधित

तालुक्यातील शिराढोण, नायगाव व गोविंदपूर या तीन महसूल मंडळातील गावातील शेेतकऱ्यांना फेब्रुवारी ते मार्च दरम्यान झालेल्या या नुकसानीपोटी आर्थिक मदत देेण्यात येणार आहे. यासाठी कळंब तालुक्याला १९ कोटी २५ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला आहे. या भागातील २३ हजार ५५४ हेक्टर बाधित क्षेत्रासाठी ही मदत दिली जाणार आहे. जिरायत क्षेत्रासाठी ६ हजार ८००, बागायतसाठी १३ हजार ६०० रुपये तर फळपिकासाठी १८ हजार रुपये हेक्टर या प्रमाणात दोन हेक्टरपर्यंत हे अनुदान दिले जाणार आहे.

या गावांचा आहे समावेश

तालुक्यातील शिराढोण, करंजकल्ला, बोरकाव (केज), हिंगणगाव, सावरगाव काळे, दाभा, कोथळा, ताडगाव, आवाड शिरपूरा, नायगाव, बोरगाव (खु), रांजणी, लासरा, जायफळ, रायगव्हाण, पाडोळी, घारगाव, पिंप्री (शि), सौंदना (अंबा), वाकडी (ई), गोविंदपूर, बोरगाव (बु), देवळाली, माळकरंजा, जवळा (खु), एकुरका, बोरवंटी, देवधानोरा, नागुलगाव, वडगाव (शि), निपाणी, हसेगाव (शि), लोहटा (पूर्व), लोहटा (पश्चिम), पिंपळगाव (टोणगे) आदी गावातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असल्याचे समजते. यात केवळ महसुली अस्तित्व असलेल्या चार गावांचा समावेश आहे तर काही गावे वगळली असल्याचे समजते.

समाधान, आशा अन् निराशाही...

गतवर्षी फेब्रुवारी ते मार्चदरम्यान झालेला अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यास २० कोटी ५८ लाख रुपये निधी मदतीसाठी आला आहे. यातील १९ कोटी २५ लक्ष रुपयाचा अधिकांश निधी कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आला आहे. ही बाब समाधानाची असली तरी तालुक्यातील उर्वरित पाच सर्कलमधील गावांना मात्र यात स्थान नसल्याने निराशा व्यक्त केली जात आहे.

Web Title: 19 crore aid process for three boards in final stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.