नवी दिल्ली - किंग खान शाहरूखच्या ‘झिरो’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला आणि चाहते बेभान झाले. होय, ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाल्या आणि सोशल मीडियावर व्ह्यूजचा जणू पाऊस पडला. रिलीजनंतरच्या अवघ्या २४ तासांत ५.४ कोटींवर लोकांनी ‘झिरो’चा ट्रेलर बघितला आणि याचसोबत देशात २४ तासांत सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या ट्रेलरमध्येही याचा समावेश झाला आहे. असं असलं तरी झिरो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण दिल्लीत अकाली दलाचे आमदार मनजिंदर सिंग सिर्सा यांनी अभिनेता शाहरुख खानविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शाहरुखच्या आगामी झिरो या सिनेमाच्या रिलीज झालेल्या पोस्टरमध्ये शाहरुखने अवहेलना करत किरपानचा वापर केला आहे. कृपाण हे शीख धर्मियांमध्ये पवित्र मानले जात असून शीख धार्मिक ते धारण करतात. मात्र, या पोस्टरमुळे शीख धर्मियांच्या भावना दुखविल्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा चित्रपट नाताळाच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या कचाड्यात सापडला आहे.
'झिरो' वादाच्या भोवऱ्यात अडकणार; शाहरुखविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 21:07 IST