वाशी रेल्वे स्टेशनजवळ तरूणाचा खून; दगडाने मारहाण झाल्याच्या खूणा
By नामदेव मोरे | Updated: April 24, 2023 19:13 IST2023-04-24T19:13:31+5:302023-04-24T19:13:35+5:30
वाशी व सानपाडा रेल्वे स्टेशनच्या मध्ये पामबीच रोडच्या पुलाखालील खड्यामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान अज्ञात तरूणाचा मृतदेह रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आला

वाशी रेल्वे स्टेशनजवळ तरूणाचा खून; दगडाने मारहाण झाल्याच्या खूणा
नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर वाशी रेल्वे स्टेशन जवळ तरूणाचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तरूणाच्या शरिरावर शस्त्राने वार केल्याचे व दगडाने मारहाण केल्याचे व्रण आढळले आहेत.
वाशी व सानपाडा रेल्वे स्टेशनच्या मध्ये पामबीच रोडच्या पुलाखालील खड्यामध्ये सकाळी ९ च्या दरम्यान अज्ञात तरूणाचा मृतदेह रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आला. स्टेशन मास्तर एस. के. सिंग यांनी याविषयी वाशी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक गजानन दराडे यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता पुलाजवळ खोदलेल्या खड्यात २८ ते ३० वर्ष वयाच्या तरूणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोळ्याच्या भुवईवर, उजव्या गालावर, ओठावर व हनुवटीवर जखमा आढळून आल्या. त्याच्यावर शस्त्राने वार केले होते. दगडाने मारहाण केल्याचेही आढळून आले आहे. या प्रकरणी वाशी रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.