बाराबंकीमधील शेतकऱ्याने विद्युत विभागाचा कार्यकारी अभियंता प्रदीप गौतम याच्यावर गंभीर आरोप केलेत. शेतकऱ्याने मुख्यमंत्री पोर्टलवर याबाबत तक्रार केली आहे.
१३ मार्च रोजी अभियंता तपासणीसाठी त्यांच्या घरी पोहोचला होता. यावेळी ‘तुझी पत्नी खूप सुंदर आहे. तुला बिल कमी करायचे असेल तर तिला माझ्याकडे एकटी पाठव’, अशी मागणी त्याने केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला. ३१ जानेवारी रोजी विद्युत विभागाच्या कार्यालयात गेल्यावरही अधिकाऱ्याने तोडलेले कनेक्शन जोडून बिल दुरुस्त करण्याच्या नावाखाली हीच मागणी केली.
प्रकरण काय?
माझ्या घरात फक्त २ एलईडी लाईट आणि १ टेबल पंखा आहे तरी मला ९४ हजार ८६४ रूपये वीज बिल आले. २ वर्षात इतके बिल कसं होऊ शकते? अधिकारी प्रदीप कुमारने वाईट हेतूने मला जास्त बिल पाठवले आणि पत्नीला त्याच्याकडे पाठवण्याची मागणी केली असा आरोप त्याने केला. अमरजीत रावत असं या शेतकऱ्याचे नाव आहे. घरात एसी, फ्रीज, कूलर काही नाही. १ वर्षापासून वीज नाही. मागील वर्षी अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कापून टाकले. त्यानंतर आजपर्यंत ते जोडले नाही असंही शेतकऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने आरोप फेटाळले
दरम्यान, माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. संबंधिताविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. १३ मार्च २०२४ रोजी आम्ही त्यांच्या घरचे कनेक्शन कापले होते. मी अमरजीत रावतला ओळखतही नाही. ते ३१ जानेवारीलाच मला भेटायला आले होते, परंतु मी बाहेर असल्याने भेट झाली नाही. थकबाकी पैसे जमा करत नसल्याने वीज कनेक्शन कापले होते. पैसे जमा करावे लागू नये यासाठी माझ्यावर असे आरोप केले आहेत असं प्रदीप कुमार यांनी म्हटलं.