कर्नाटकची राजधानी आणि हाय-टेक शहर असलेल्या बंगळुरूमध्ये एका ५७ वर्षीय महिलेला मोठ्या सायबर फसवणूकीचा सामना करावा लागला आहे. फसवणूक करणाऱ्यांनी महिलेला लाखोंचा नव्हे तर कोट्यवधींचा गंडा घातला आहे. या धक्कादायक घटनेत महिलेचं तब्बल ३१.८३ कोटींचं नुकसान झालं. स्थानिक पोलिसांनी ही डिजिटल अरेस्टची घटना असल्याचं म्हटलं आहे.
सप्टेंबर २०२४ मध्ये महिलेच्या नावाने बुक केलेल्या पार्सलमध्ये बेकायदेशीर वस्तू असल्याचा आरोप करून बनावट डीएचएल कॉलने हे प्रकरण सुरू झालं. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी तिला स्काईपद्वारे आणखी घाबरवलं, सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून सतत भीती दाखवली. पुढच्या वर्षभरात महिलेला प्रॉपर्टी व्हेरिफिकेशन आणि कर भरण्यासाठी पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडलं गेलं.
मार्च २०२५ पर्यंत एकूण १८७ ट्रान्झेक्शनमुळे महिलेने आयुष्यभराची कमाई गमावली. तक्रारीत महिलेने म्हटलं आहे की, या धक्कादायक अनुभवातून सावरण्यासाठी आणि या आघातानंतर शारीरिक आणि मानसिक स्थिरता परत मिळविण्यासाठी तिला अनेक महिने लागले. आयटी एक्ट आणि बीएनएस तरतुदींनुसार सीईएन गुन्हे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
हैदराबाद सायबर क्राइमपोलिसांनी "डिजिटल अरेस्ट" घोटाळ्यात टीडीपी आमदार पुट्टा सुधाकर यादव यांच्याकडून १.०७ कोटी रुपये उकळल्याच्या आरोपाखाली खासगी बँकेच्या दोन मॅनेजरसह आठ जणांना अटक केली आहे. एका आठवड्यापूर्वी या लोकांना अटक करण्यात आली होती, पण आता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबरमध्ये एका गँगने म्यदुकुरचे आमदार आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या बंजारा हिल्स येथील घरी तीन दिवस डिजिटल अरेस्ट करून ठेवलं होतं. मुंबई पोलीस असल्याचं भासवून गँगने त्यांच्यावर मनी लाँड्रिंगचा मोठा आरोप केला. आमदारची असल्याची माहिती असल्याने फसवणूक करणाऱ्यांनी निवडणुकीचा आणि बेकायदेशीर कृत्यांचा उल्लेख करून त्यांना धमकावलं.