Delhi BMW Accident: दिल्ली कॅन्टोन्मेंट मेट्रो स्टेशनजवळ बीएमडब्ल्यू कार अपघातात जीव गमावलेल्या अर्थ मंत्रालयातील अधिकारी नवज्योत सिंग यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात बीएमडब्ल्यू कार चालक गगनप्रीत कौर हिला अटक करण्यात आली. आरोपी गगनप्रीतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी तिला रुग्णालयातूनच अटक केली. आता या प्रकरणात नवज्योत सिंग यांच्या कुटुंबाने धक्कादायक खुलासा केला आहे. अपघातानंतर जवळ रुग्णालये असतानाही आरोपीने त्यांना २० किलोमीटर लांब रुग्णालयात नेले होते.
रविवारी दुपारी झालेल्या अपघातात अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील उपसचिव नवज्योत सिंग (५२) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. हरी नगर येथील रहिवासी असलेले हे जोडपे बांगला साहिब गुरुद्वाराहून घरी परतत असताना हा अपघात झाला. रविवारी दुपारी १:३० वाजता रिंग रोडवरील दिल्ली कॅन्टोन्मेंट मेट्रो स्टेशनजवळ त्यांच्या बाईकला बीएमडब्ल्यूने धडक दिली. या धडकेनंतर त्यांची बाईक एका बसला धडकली. हा अपघात इतका भीषण होता की,बीएमडब्ल्यू रस्त्यावर उलटी पडली होती. तर जखमी सिंह आणि त्यांची पत्नी मेट्रो पिलरजवळीव रस्त्यावर पडले होते. दोघांनाही अपघातस्थळापासून सुमारे १९ किमी अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यात आले. वाहतूक कोंडी झाल्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना रस्त्यावर बाजूला पडलेल्या गाड्या दिसल्या.
या घटनेनंतर मुलाने आरोप केला की आरोपीने जाणूनबुजून त्यांना अपघातस्थळापासून दूर असलेल्या रुग्णालयात नेले. जर माझ्या वडिलांना २० किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयाऐवजी जवळच्या रुग्णालयात नेले असते तर त्यांचा जीव वाचू शकला असता, असं नवज्योत यांच्या मुलाने म्हटलं. तर "मी वारंवार महिलेला (आरोपी) माझ्या पतीला जवळच्या रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केली. माझ्या पतीला लगेच प्राथमिक उपचारांची आवश्यकता होती, पण तिने जाणूनबुजून माझ्या पतीला जवळच्या रुग्णालयात न नेता २० किलोमीटर अंतरावर असलेल्या न्यू लाईफ रुग्णालयात नेले. माझ्या पतीला तिथे स्ट्रेचरवर खूप वेळ वाट पहावी लागली, असं नवज्योत सिंग यांच्या पत्नीने म्हटलं.
दरम्यान, पोलीस तपासात आढळले की अपघाताच्या वेळी गगनप्रीत नावाची महिला बीएमडब्ल्यू चालवत होती आणि तिचा पती शेजारच्या सीटवर बसला होता. धडकेनंतर कार उलटली होती. त्यानंतर गगनप्रीतने २० किलोमीटरवर असलेल्या न्यू लाईफ रुग्णालयात दोघांनाही नेले होते. पोलिसांनी सांगितले की हे तेच रुग्णालय आहे ज्यात गगनप्रीतचे वडील परीक्षित भागीदार आहेत. त्यामुळे सिंग यांनाना जाणूनबुजून या रुग्णालयात नेण्यात आले होते का, याचा तपास सुरु आहे.