लखनौ - उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद इथं पोलिसांनी सुनील नावाच्या युवकाच्या संशयास्पद मृत्यूचं रहस्य उलगडले आहे. सुनीलची हत्या त्याची पत्नी शशी आणि तिचा प्रियकर यादवेंद्र याने केल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टात हजर केले.
माहितीनुसार, आरोपी शशीने प्रियकरासोबत मिळून पती सुनीलला मारण्याचं षडयंत्र रचले. पती सुनीलला विष टाकलेले दही खायला देत त्याला मारून टाकले. याबाबत सुनीलची आई रामढकेली यांनी २४ जुलैला पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. या तक्रारीने महिलेने मुलाच्या मृत्यूसाठी पत्नी शशी आणि तिचा प्रियकर याला जबाबदार धरले होते. पोलिसांनी या घटनेचा तपास केला तेव्हा सुनीलची पत्नी शशी आणि गावातील यादवेंद्र नावाच्या युवकाचे मागील १ वर्षापासून अफेअर सुरू होते असं समोर आले. सुनील या दोघांच्या नात्यात अडसर ठरत होता. त्यामुळे या दोघांनी त्याला वाटेतून दूर करण्याचं ठरवले होते.
सुनीलचा काटा काढण्यासाठी पत्नी शशीने ऑनलाईन नशेचे औषध मागवले. १२ मे रोजी शशीने सुनीलला दही खायला दिले. याच दह्यात तिने विष टाकले होते. दही खाल्ल्यानंतर सुनीलची तब्येत ढासळली. त्याची तब्येत हळूहळू बिघडू लागली. पत्नीने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे उपचारानंतर प्रकृती ठीक झाली आणि मग सुनील घरी परतला. त्यानंतर पुन्हा १४ मे रोजी शशीने दुसऱ्यांदा त्याच्या दह्यात विष मिसळले. यानंतर सुनीलचा मृत्यू झाला. नातेवाईकांना बोलावून तिने सुनीलवर अंत्यसंस्कार केले होते. जर सुनीलच्या आईने तक्रार केली नसती तर कदाचित हे आरोपी मोकाट राहिले असते.
ऑनलाईन मागवलं विष, सुनीलला पाजले
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला तेव्हा आरोपींनी इंदूरमधील एका हत्याकांडातून प्रेरित होऊन विषारी पदार्थ ऑनलाईन मागवला होता हे समोर आले. मृत सुनील यादव यांचे १२ वर्षापूर्वी शशीसोबत लग्न झाले होते. १० वर्षीय अंशू आणि ६ वर्षीय दीपांशी अशी त्यांना २ मुले आहेत. सुनील शेतीसोबतच फिरोजाबाद येथे नोकरीही करत होता. आता वडिलांच्या मृ्त्यूनंतर आई जेलमध्ये गेल्याने २ मुले एकटी पडले आहेत. या प्रकरणी पोलिसांना कोर्टात गुन्हा सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे कारण यातील मृतदेहाचे पोस्टमोर्टम झाले नव्हते. सुनीलचे कपडे, चादर आणि कॉल डिटेल्स यातून पोलीस काही ठोस पुरावा सापडतो का याचा तपास करत आहेत.