वानापर्थी जिल्ह्यातून एक अतिशय क्रूर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ औषध आणि जेवणासाठी पैसे मागितल्याने सुनेने आपल्या वृद्ध सासूला काठी आणि लाटण्याने बेदम मारहाण करून तिची हत्या केली. सासूचा खून केल्यानंतर सुनेने मोठ्या शिताफीने सर्व पुरावे मिटवले आणि पतीला नैसर्गिक मृत्यू झाल्याचे खोटे सांगितले. मात्र, अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबीयांना सासूच्या पाठीवर जखमांचे निशाण दिसले आणि या भयंकर हत्येचा खुलासा झाला. पोलिसांनी आरोपी सुनेला अटक करून तुरुंगात पाठवले आहे.
नेमकं काय घडलं?
ही हृदय पिळवटून टाकणारी घटना वानापर्थी जिल्ह्यातील रेवल्ली मंडल अंतर्गत येणाऱ्या नागपूर गावात घडली. डोड्डी येल्लम्मा या गेल्या काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या त्यांचा मुलगा मल्लैया आणि सून डोड्डी बोगुरम्मा यांच्यासोबत राहत होत्या. आजारपणामुळे येल्लम्मा यांना वारंवार औषध आणि जेवणासाठी पैसे मागावे लागत होते. मात्र, सासूचे वारंवार पैसे मागणे सून बोगुरम्माला अजिबात आवडत नव्हते. यातून सासू-सुनेमध्ये अनेकदा वादविवाद होत असत.
संतापलेल्या सुनेने आखला हत्येचा कट!
सासूच्या सततच्या मागणीमुळे बोगुरम्मा इतकी वैतागली होती की, तिने सासूलाच संपवण्याचा निर्णय घेतला. यामुळे पैसे देण्याची आणि भांडणाची समस्या कायमस्वरूपी मिटेल, असा विचार तिने केला. ४ ऑक्टोबर रोजी बोगुरम्मा हिने सासूला मारण्याचा कट रचला. तिचा पती आणि शेजारी घरात नसताना तिने संधी साधली. सुनेने काठी आणि लाटणे घेऊन वृद्ध सासू येल्लम्मावर हल्ला केला. सासूचा मृत्यू होईपर्यंत ती तिला मारहाण करत राहिली. शिक्षा टाळण्यासाठी, तिने ही हत्या नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
अंत्यसंस्कारावेळी रक्ताचे डाग दिसले अन्...
हत्या केल्यानंतर बोगुरम्मा हिने अत्यंत काळजीपूर्वक घरातील सर्व पुरावे नष्ट केले. पतीने शेतातून परत येण्यापूर्वी तिने बिछाना आणि जमिनीवरील रक्ताचे डाग पुसून टाकले. तिने नातेवाईक आणि शेजाऱ्यांना सांगितले की, सासूबाईंचा वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे मृत्यू झाला आहे. सासूचे वय जास्त असल्याने आणि त्या सतत आजारी असल्याने लोकांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.
दुसऱ्या दिवशी येल्लम्मा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या पाठीवर रक्ताचे आणि गंभीर जखमांचे व्रण दिसले. यानंतर, उपस्थित लोकांनी बोगुरम्माकडे चौकशी केली. तेव्हा तिने सासूची हत्या केल्याची कबुली दिली. मृत सासूच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर, पोलीस गावात पोहोचले आणि आरोपी सुनेला तात्काळ अटक केली. चौकशीदरम्यान, सासू रोज औषध आणि जेवणासाठी पैसे मागत असल्याने त्रासून तिने हे कृत्य केल्याचे सुनेने सांगितले.
Web Summary : Woman in Wanaparthy killed her mother-in-law for demanding money. She concealed the crime, claiming natural death, but autopsy revealed brutal injuries. Police arrested her.
Web Summary : वानापर्थी में बहू ने पैसे मांगने पर सास को मार डाला। अपराध छुपाने के लिए प्राकृतिक मौत का दावा किया, लेकिन पोस्टमार्टम में चोटें उजागर हुईं। पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया।