शाहजहापूर - उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथील ३५ वर्षीय कोट्यधीश उद्योगपतीने पत्नी आणि मुलासह आयुष्य संपवलं आहे. ही बातमी पसरताच शहरात खळबळ माजली. व्यावसायिक सचिन ग्रोवर यांनी पत्नीसह हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी ३६ पानी सुसाईड नोट व्हॉट्सअपवर पाठवली होती. त्यात आत्महत्या करण्यामागचे कारण सांगितले आहे.
शाहजहापूरच्या पॉश परिसरात दुर्गा एन्क्लेव आहे. इथं ३५ वर्षीय सचिन ग्रोवर त्यांच्या कुटुंबासह राहतात. सचिन ग्रोवर यांचं नाव प्रसिद्ध उद्योगपतीच्या यादीत घेतले जाते. सचिनचे वडील विजय कुमार यांच्या वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झाले. घरात आई, दोन भावांसह सचिन राहत होता. २२०० स्क्वेअर फूटाचे २ मजली दुकान या व्यावसायिकाचे आहे. ८ वर्षापूर्वी घरासमोरच राहणाऱ्या त्यांची गर्लफ्रेंड शिवांगीसोबत त्यांचे लव्ह मॅरेज झाले. लग्नानंतर सचिन घराच्या पहिल्या मजल्यावर शिफ्ट झाला. बाकी सगळे तळमजल्यावर राहत होते. सचिनच्या घराची किंमत करोडो रूपये होती. सचिनचे भाऊ रोहित आणि गौरव दोघांचेही लग्न झाले होते. सचिनचं पानीपत शहरात हँडलूम नावाने २ शोरूम होते. दोघेही भाऊ याच व्यवसायात होते.
बुधवारी सचिन त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही. त्यावेळी खिडकीतून आत पाहिले तेव्हा सचिन आणि शिवांगी यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. शिवांगीचा मृतदेह बेडरूममध्ये होता तर सचिनचा ड्रॉईंग रूमध्ये लटकलेला होता. गोंधळात दरवाजा तोडण्यात आला तेव्हा ४ वर्षाच्या चिमुकल्याचा मृतदेहही बेडवर पडला होता. या तिघांना तातडीने रुग्णालयात नेले परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले.
३६ पानी सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवले. तपासाला सुरुवात केली. तपासात मृत्यूपूर्वी सचिनची पत्नी शिवांगीने ३६ पानी सुसाई़ड नोट आईला व्हॉट्सअपवर पाठवली होती. त्यात लिहिले होते की, माझ्यामुळे तुम्ही चिंतेत असता, आता तुम्ही आरामात राहू शकता. त्या चिठ्ठीत आर्थिक तंगी आणि कर्जाबाबत उल्लेख होता. घर आणि वाहनावरील कर्ज सांगितले होते. तर मंगळवारी संध्याकाळी आम्ही मार्केटहून परतलो, तेव्हा दीर आणि जाऊ मुलासह खूप मस्ती करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा तणाव आहे असं वाटले नाही. त्यांनी माझ्याकडे मोबाईल चार्जरही मागितले होते. त्यांनी हे पाऊल का उचलले हे सांगता येत नाही. या घटनेने सचिनच्या आईला मोठा धक्का बसला आहे. आता त्यांचा मुलगा, सून आणि नातू या जगात नाहीत यावर त्यांचा विश्वास बसत नाही असं सचिनची वहिनी ज्योतीने सांगितले.