आतापर्यंत 'लुटेरी दुल्हन' अर्थात पतीला लुबाडणाऱ्या वधूंची अनेक प्रकरणे कानावर आली असतीलच, पण आता बिहारच्या गोपालगंजमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथल्या एका 'व्हायरल गर्ल'सोबत चक्क तिच्या नवऱ्यानेच लाखोंची फसवणूक केली आहे. लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर पती घरातून लाखो रुपये आणि मोबाईल घेऊन फरार झाल्याने मनीषा कुमारी हवालदिल झाली आहे. या घटनेने सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू झाली आहे.
कोण आहे मनीषा कुमारी?
कुसुम कुमारी उर्फ मनीषा कुमारी ही गोपालगंज जिल्ह्यातील पुरैना पथरा येथील रहिवासी आहे. मनीषा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असून, ती एका गरीब कुटुंबातून आहे. ती सोशल मीडियावर रील्स बनवते आणि काही काळापूर्वी तिचा एक व्हिडीओ रातोरात खूप व्हायरल झाला. यातून तिची चांगली कमाई होऊ लागली, ज्यातून ती आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.
सोशल मीडियावरील प्रेम, कोर्ट मॅरेज आणि विश्वासघात!सोशल मीडियामुळेच मनीषाची ओळख एका तरुणाशी झाली आणि हळूहळू त्यांच्यात प्रेम फुलले. दोघांनी सोशल मीडियावरच एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. काही दिवसांनी त्यांनी मंदिरात लग्न केले आणि नंतर कोर्ट मॅरेजही केले. मनीषाला वाटले होते की आता तिचे आयुष्य मार्गी लागले आहे.
मात्र, लग्नाच्या अवघ्या १० दिवसांनंतर पती अक्षय चौरसियाने मनीषाला मोठा धक्का दिला. त्याने मनीषाला तिच्याच घरात बाहेरून बंद केले आणि तिचा मोबाईल फोन तसेच सोशल मीडियातून तिने कमावलेले लाखो रुपये घेऊन पसार झाला.
पोलिसांनी दिले कारवाईचे आदेशया प्रकारानंतर रडत-रडत मनीषाने पोलिसांत धाव घेतली. तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला आणि तक्रार दाखल केली. मात्र, सुरुवातीला पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा मनीषाचा आरोप आहे. निराश झालेल्या मनीषाने शेवटी एसपी अवधेश दीक्षित यांची भेट घेतली.
एसपी दीक्षित यांनी मनीषाचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले आणि या प्रकरणात तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी मनीषाला न्याय मिळेल असे आश्वासनही दिले आहे. मनीषाने दिलेल्या माहितीनुसार, अक्षय सुमारे १० लाख रुपये घेऊन फरार झाला आहे.