मुंबई - भाजपाच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध बीडच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबुब शेख यांच्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातील वृत्ताला स्वत: चित्रा वाघ यांनीही ट्विटवरुन व्हिडिओ शेअर करत दुजोरा दिला आहे. मात्र, महिलांवरील अत्याचाराविरोधात बोलल्यामुळे माझ्यावर गुन्हा नोंद होत असेल तर, असे 100 गुन्हे झाले तरी चालतील, असेही त्यांनी म्हटलंय.
राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर औरंगाबादमधील एका तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलीस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला होता. तसेच, 18 जुलै रोजी बीड दौऱ्यावर असतानाही मेहबुब शेख यांच्यावरील आरोपाचा पुनर्उच्चार केला होता. त्यावरुन, शेख यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, गुन्हा नोंद झाल्याचे समजते.
“18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार (जिल्हा परिषद सदस्य बीड) यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर असंख्य कार्यकर्ते हजर होते. चित्रा वाघ यांनी शिरुर येथे येऊन माझी बदनामी व्हावी या उद्देशाने मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचं सांगत, मला बलात्कारी म्हटलं. तसेच राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही, असं त्यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे.”
“वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र, तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला”, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. “चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची व्हिडीओ क्लिप काही पत्रकार मित्रांनी मला दाखवली, जी पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली”, असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय.
दरम्यान, चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन व्हिडिओ शेअर करत, महिलांवरील अन्याय, लैंगिक शोषणाविरुद्ध आवाज उठवल्यामुळे माझ्यावर गुन्हा नोंद होत असेल तर, असे 100 गुन्हे दाखल झाले तरी चालतील, असे वाघ यांनी म्हटलंय. तसेच, मी आज चिपळूण दौऱ्यावर असल्याने अनेकांनी मला फोन करुन यासंदर्भात माहिती दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.