बिहारच्या मुजफ्फुरपूरमध्ये आठवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच या मुलीसोबत घाणेरडे कृत्य केले. आरोपी टेडी बेअर घेऊन देण्याचा बहाणा करून पीडित मुलीला गाडीत बसवून घरापासून दूर घेऊन गेला. यानंतर त्याने मुलीवर बळजबरी केली आणि पुन्हा तिला गाडीतून घरी आणून सोडलं. हा प्रकार मुलीच्या कुटुंबाला कळताच त्याच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी देखील या व्यक्तीला ताब्यात घेतलं.
या संदर्भात पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायदा आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. तक्रार दाखल करताना या मुलीच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, पीडित विद्यार्थिनी तिच्या घराबाहेर खेळत होती. दरम्यान, आरोपी आला आणि तिला टेडी बेअर देण्याच्या बहाण्याने त्याच्या कारमध्ये बसवून घरापासून दोन किलोमीटर दूर घेऊन गेला. त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर, आरोपीने पीडितेला तिच्या घरी परत आणून सोडले आणि त्याने तिथून पळ काढला.
मुलीने घरच्यांना सांगितली आपबिती
आरोपी निघून गेल्यानंतर, पीडिता तिच्या घरी गेली आणि तिच्या आईला आपबिती सांगितली. यानंतर, संतापलेले मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरी चौकशी करण्यासाठी पोहोचले. मात्र, आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने पीडित मुलीच्या कुटुंबाला शिवीगाळ केला. यामुळे घटनास्थळी गोंधळ सुरू झाला. आरोपीने गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु लोकांनी त्याला घेरले आणि गाडीवर दगडफेक केली. दरम्यान, माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीला दोन तासांत सोडले?मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पोलिसांनी आरोपीला दोन तासांनंतर सोडून दिले. मात्र,एफएसएल टीमच्या सहकार्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे पोलिसांनी म्हटले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, तुर्की पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदवला नाही, तेव्हा त्यांनी महिला पोलीस ठाण्यात तक्रार केली. आता महिला पोलिस ठाणे या प्रकरणाचा तपास करत आहे. महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अदिती कुमारी म्हणाल्या की, मुलीसोबत घडलेल्या अमानुष घटनेबाबत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सदर रुग्णालयात तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.