उल्हासनगर : शहरातील प्रकाश खानचंदानी व रेणू रायखगार यांना जादा नफ्यासाठी क्रिप्टोत पैसे गुंतवणूकीचे आमिष दाखवून, त्यांची ६३ लाखाने ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर व हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
उल्हासनगर कॅम्प नं-१, रिजेन्सी अंटेलिया मध्ये राहणारे प्रकाश ग्यानचंद खानचंदानी यांना १५ मे २०२५ रोजी दुपारी त्यांच्या मोबाईलवर कशवी व कस्टमर केअर नावाने फोन आला. त्यांनी जादा नफयाचे आमिष प्रकाश यांना दाखवून विविध बँक खात्यात ऑनलाईन पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यांनी ४१ लाख २१ हजार ६८० रुपये विविध खात्यात ऑनलाईन भरूनही नफा दिला जात नसल्याने, आपली फसावणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी झालेला प्रकार पोलिसांना कथन केल्यावर, उल्हासनगर पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
तर दुसऱ्या घटनेत रेणू जगदीश रायखगार यांना अवंती स्नेहा, प्रशिक्षक अमेया व रिशिपनिष्ठ मायाकुमारी या तीघींचा मोबाईलवर ८ ते १३ ऑगस्ट दरम्यान डिजिटल पीआर लिमिटेड कंपनी मधून बोलत असल्याचे फोन आले. त्यांनी टास्क खेळण्याचे आमिष दाखवून टास्क जिंकल्या प्रकरणी रेणूच्या बँक खात्यात १९ हजार ८९८ रुपये पाठविले. तसेच क्रिप्टो मध्ये जादा नफयाचे आमिष दाखवून पैसे विविध खात्यात ऑनलाईन भरण्यास सांगितले. रेणू यांनी विविध बँक खात्यात २१ लाख १९ हजार ९९९ रुपये भरल्यानंतरही नफा मिळत नसल्याने, आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांच्या तक्रारीवरून हिललाईन पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.