लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : मीरा रोडच्या दोघा तरुणांना थायलंड येथे फेसबुकमध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवत त्यांना थायलंडवरून बेकायदा म्यानमार देशात नेऊन सायबर गुन्ह्यासाठी बळजबरीने राबविण्यात आले. मीरा-भाईंदर गुन्हे शाखा १ ने हे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आणत दोघांना अटक केल्याची माहिती मीरा भाईंदर-वसई विरार पोलिस आयुक्त निकेत कौशिक यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या रॅकेटचा मुख्य सूत्रधार चीनचा असून, अशा अनेक टोळ्या कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.
थायलंड देशात फेसबुक कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी लावण्याचे प्रलोभन नयानगरच्या हैदरी चौक भागात राहणारा आसिफ खान ऊर्फ नेपाळी याने सय्यद इरतिझा हुसैन व अम्मार लकडावाला यांना दाखवले. ऑगस्ट २०२५ मध्ये आसिफ खान याने म्यानमार देशात असलेला त्याचा साथीदार अदनान शेख याच्या मदतीने दोघांना थायलंड येथे पाठवले. हुसेन व लकडावाला यांना थायलंडमधील इतर साथीदारांच्या मदतीने बेकायदा म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीकरिता पाठवले.
अशी केली फसवणूकयाची माहिती बातमीदारांमार्फत मीरा भाईंदर गुन्हे शाखा कक्ष १ ला मिळाली होती.पोलिस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या पथकाने म्यानमारमध्ये डांबून ठेवलेल्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फसगतीबद्दल सांगितले. त्या दोघांना म्यानमार देशातील युयू८ या सायबर फ्रॉड करणाऱ्या कंपनीत लिओ या चिनी आणि स्टिव्ह आण्णा या भारतीयाने भारतीय मुलींच्या नावाने फेसबुकवर बनावट खाते उघडून दिले. त्याद्वारे परदेशातील भारतीय लोकांशी फ्रेंडशिप करून त्यांचा व्हाॅट्सॲप नंबर मिळवायचा व त्यांना क्रिप्टोकरन्सी व बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करायला सांगून त्यांची फसवणूक करण्याचे काम करण्याचे प्रशिक्षण दिले व गुन्हा करण्याच्या कामास भाग पाडले.
तरुणांच्या सुटकेसाठी सहा लाख केले वसूल पीडित दोन्ही तरुणांना कंपनीच्या इमारतीबाहेर जाण्यासही बंदी होती. काम न केल्यास त्यांचा शारीरिक छळ केला. या जाचातून सुटका करून घेण्यासाठी भारतीय चलनातील सहा लाख रुपये खंडणी म्हणून पाच भारतीय बँक खात्यांवर वसूल केले. खंडणीची रक्कम जमा झाल्यानंतरच त्यांची मुक्तता केली गेली. मीरा रोडमध्ये परत आल्यानंतर त्यांच्या फिर्यादीनुसार नयानगर पोलिस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तपासात गुन्हे शाखेने एजंट आसिफ खान ऊर्फ नेपाळी याला नयानगरमधून अटक केली. तर खंडणीची रक्कम स्वीकारणाऱ्यांपैकी एक आरोपी रोहित कुमार मरडाणा (रा. विशाखापट्टणम) याला सुरत येथून अटक केली. अनेक टोळ्या कार्यरत आहेत. त्यामुळे तरुणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले.
Web Summary : Two Mira Road men were trafficked to Myanmar for cybercrime after a fake job offer in Thailand. Police busted the international racket, arresting two. Victims were forced into fraud, extorted for release. A Chinese mastermind is suspected.
Web Summary : थाईलैंड में नौकरी के झूठे वादे के बाद मीरा रोड के दो लोगों को म्यांमार में साइबर अपराध के लिए मजबूर किया गया। पुलिस ने दो को गिरफ्तार कर अंतरराष्ट्रीय गिरोह का भंडाफोड़ किया। पीड़ितों को धोखाधड़ी के लिए मजबूर किया गया, रिहाई के लिए उगाही की गई। एक चीनी सरगना संदिग्ध है।