नवी मुंबई : नैना क्षेत्रातल्या भूखंडाचे मोजमाप करून त्याचा अहवाल देण्यासाठी ९ लाखांची लाच मागणाऱ्या सिडकोच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तडजोड केल्यानंतर ते ६ लाख रुपये घेण्यासाठी बेलापूर स्थानकाच्या पार्किंगमध्ये लाचखोर अधिकारी भेटले असता, मंगळवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. दोघांवरही सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार विकासकाचा नैना क्षेत्रात भूखंड आहे. तो विकसित करण्यापूर्वी सिडकोमार्फत त्याचे मोजमाप करून आवश्यक परवाने मिळवायचे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी सिडकोच्या भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केला होता. मोजणीचा अहवाल देण्यासाठी नैना क्षेत्रातले भूमी अभिलेख कलीमोद्दीन शेख (३७) याने उपअधीक्षक दिलीप बागुल (५५) यांच्यासोबत तक्रारदारांची भेट घडवली. बागुल यांनी अहवाल देण्यासाठी ९ लाख रुपये मागितले. तडजोड केल्यानंतर ६ लाख देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली होती. त्यावरून उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या पथकाने बेलापूर रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये सापळा रचला.
कारसह मोबाइल अन् दोन लाखांची रोकड जप्त
दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांवर सीबीडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत कारसह दोघांचे मोबाइल लाचलुचपत विभागाने जप्त केले आहेत. यात पोलिसांनी दोन लाखांच्या खऱ्या तर चार लाखांच्या बनावट नोटांचा वापर केला. या घटनेवरून विकासकांना भूमापन करण्यासाठीदेखील अधिकाऱ्यांचे खिसे गरम करावे लागत असल्याचे समोर आले आहे.