लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 11:12 AM2021-05-29T11:12:27+5:302021-05-29T11:12:41+5:30

Two arrested for taking liquor and mutton party as bribe : मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे.

Two arrested for taking liquor and mutton party as bribe | लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक

लाच म्हणून दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक

Next

बुलडाणा: भावाच्या नावे घेतलेल्या प्लॉटची सातबारावर नोंदणी करून फेरफार नक्कल देण्यासाठी दहा हजार रुपये स्वीकारून चक्क दारू व मटनाची पार्टी घेणाऱ्या मंडळ अधिकारी व तलाठ्यास बुलडाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मद्य व मटनावर तावमारतांनाच रंगेहात अटक केली आहे. विशेष म्हणजे या कारवाईत चाल लुचपत प्रतिबंधक विभागाने दोन मद्याच्याही बाटल्या जप्त केल्या आहेत.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजेदरम्यान खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर शिवारातील प्रल्हाद चव्हाण नामक व्यक्तीच्या शेतातील झोपडीसमोर ही कारवाई केली. या कारवाईत लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर (रा. लाखनवाडा) आणि शिर्ला नेमाणे येथील तलाठी बाबुराव उखर्डा मोरे (रा. किन्ही महादेव, खामगाव) या दोघांना अटक केली आहे.
खामगाव तालुक्यातील शिर्ला नेमाणे येथील एका ४२ वर्षीय व्यक्तीने त्याच्या भावाच्या नावाने प्लॉट घेतला होता. त्याची सातबारा नोंद घेऊन फेरफार नक्कल देण्यासाठी लाखनवाडा येथील मंडळ अधिकारी विलास साहेबराव खेडेकर आणि तलाठी बाबुराव उखर्डा मोरे यांनी दहा हजार रुपयांची लाच आणि मद्य व मटनाची पार्टी मागितली होती. यातील दहा हजार रुपये यापूर्वी उपरोक्त दोन्ही आरोपींना देण्यात आले होते. मटनाच्या पार्टीसाठी तेवढा आरोपींचा आग्रह सुरू होता. याप्रकरणी त्रस्त झालेल्या व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या आधारावर सापळा रचून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंडळ अधिकारी व तलाठ्यास अटक केली. या कारवाईत एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी, पोलिस निरीक्षक सचीन इंगळे, पोलिस नाईक विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान, विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, नितीन शेटे, शेख अर्शद यांनी या कारवाईत सहभाग घेतला.


ताव मारत असतानाच कारवाई
२८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजे दरम्यान तक्रारदाराकडून खामगाव तालुक्यातील पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडीसमोर दारू व मटनाची पार्टी सुरू असतानांच एसीबीचे पोलिस उपअधीक्षक संजय चौधरी व त्यांचे सहकारी पोहोचले व त्यांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सोबतच मद्याच्या दोन बाटल्याही जप्त केल्या. कारवाईदरम्यान नाशवंत असलेले पदार्थ तेथेच पंचासमक्ष नष्ट करण्यात आले. म्हणजे ज्यावर आरोपी ताव मारत होते ते खाद्यपदार्थही एसीबीने तेथे नष्ट केले.

Web Title: Two arrested for taking liquor and mutton party as bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.