Jalgaon Crime News: डोळ्यात मिरचीची पूड टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 22:13 IST2021-12-04T22:13:24+5:302021-12-04T22:13:42+5:30
लोहारी-पाचोरा दरम्यान एका ढाब्याजवळ दोन जणांनी कमलेश यांची मोटारसायकल अडवित डोळ्यात मिरची पावडर फेकली.

Jalgaon Crime News: डोळ्यात मिरचीची पूड टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न
पाचोरा जि. जळगाव : वरखेडीहून पाचोऱ्याकडे मोटारसायकलीने जाणाऱ्या सराफाच्या डोळयात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. सराफाने हातातील पैशांची बॅग न सोडल्याने त्याला शेतात फरफटत नेत मारहाण करण्यात आली. ही घटना पाचोरा- वरखेडी रस्त्यावर शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
कमलेश भटू बाविस्कर (रा. पाचोरा) असे या सराफाचे नाव आह. वरखेडी येथे त्यांचे स्वामी समर्थ ज्वेलर्स हे दुकान आहे. ते रोज वरखेडी ते पाचोरा अशी ये-जा करतात. शनिवारी सायंकाळी ते वरखेडी येथील कापड दुकानावर कामाला असणाऱ्या राहूल या तरुणासोबत पाचोऱ्याकडे मोटारसायकलीने जात होते. लोहारी-पाचोरा दरम्यान एका ढाब्याजवळ दोन जणांनी कमलेश यांची मोटारसायकल अडवित डोळ्यात मिरची पावडर फेकली. काही क्षणात लुटारुंनी त्यांना शेजारील शेतात फरफटत नेत मारहाण केली. बाविस्कर यांनी सोबत असलेल्या राहुलला यास पळून जाण्यास सांगितले. कमलेश यांनी जवळची बॅग न सोडता आरडाओरड केल्याने लुटारु तिथून पळून गेले.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे, पिंपळगाव हरेश्वर ठाण्याचे स.पो.नि कृष्णा भोये हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. सराफ दुकानदारास पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.