Delhi encounter news: शूटआऊट अॅट लोखंडवाला चित्रपट बघून गँग बनवणाऱ्या माया गँगच्या म्होरक्यापर्यंत अखेर पोलीस पोहोचले. सोमवारी दिल्लीतील रस्त्यावर पोलिसांनी पाठलाग केला. त्यावेळी त्याने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात माया गँगचा म्होरक्या जखमी झाला. त्याला अटक करण्यात आली असून, सागर असे त्याचे नाव आहे. त्याचे वय २३ वर्षे आहे.
'मौत का दुसरा नाम माया' असे लोगो तयार करून दहशत निर्माण करणाऱ्या आणि लोकांची लूट करणाऱ्या माया गँगच्या म्होरक्याचा पोलिसांनी करेक्ट कार्यक्रम केला. या गँगमध्ये अनेक गुंड सामील असून, त्यांनाही पकडण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलीस आणि गँगस्टरमध्ये चकमक
दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त हेमंत तिवारी यांनी सांगितले की, चोऱ्या करणाऱ्या, दरोडे टाकणाऱ्या माया गँगचा म्होरक्या सागर याला दिल्ली पोलिसांच्या एसटीएफने अटक केली. त्याला पकडत असताना चकमक झाली. २३ सप्टेंबरच्या रात्री सरिता विहार उड्डाणपूलावर ही घटना घडली.
आरोपी सागर चकमकीमध्ये जखमी झाला असून, त्याच्याकडून ३२ बोअर आकाराचा एक पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि तीन रिकामी काडतुसे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
टॅटूवरून गँगची ओळख
माया गँगमध्ये असलेल्या सगळ्यांनी 'मौत' असा टॅटू त्यांच्या अंगावर गोंदून घेतलेला आहे. याच टॅटूवरून तो गँगमध्ये असलेल्या ओळख पटवली जाते. सागरवर १२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातही तो फरार होता. त्याचबरोबर तो गुंडाकडून संरक्षण पुरवण्यासाठी पैसे घ्यायचा असेही पोलिसांनी सांगितले.